घरक्रीडाक्रिकेट स्टेडियममधील सुविधा सुधारण्याची गरज!

क्रिकेट स्टेडियममधील सुविधा सुधारण्याची गरज!

Subscribe

राहुल द्रविडचे मत

भारतीय संघ येत्या शुक्रवारपासून बांगलादेशविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये आपला पहिलावहिला डे-नाईट (प्रकाशझोतात) कसोटी सामना खेळणार आहे. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमुळे मागील काही वर्षांत चाहते कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवत असल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, चाहत्यांना कसोटी क्रिकेट पाहण्यासाठी स्टेडियमकडे वळवण्यात डे-नाईट सामने फायदेशीर ठरतील, असे मत भारताचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष राहुल द्रविडने व्यक्त केले. परंतु, कसोटी क्रिकेटला नवचैतन्य मिळण्यासाठी हा एकमेव पर्याय नाही, असेही द्रविडला वाटते.

कसोटी क्रिकेटला नवचैतन्य मिळण्यासाठी डे-नाईट सामने हा एकमेव पर्याय नाही. मात्र, आपण हा पर्याय वापरणे गरजेचे होते. आपण जर दवावर नियंत्रण ठेऊ शकलो, तर भारतात दरवर्षी एकतरी डे-नाईट कसोटी सामना होऊ शकेल. दवामुळे चेंडू ओला झाल्यास गोलंदाजांना अडचण निर्माण होईल. गुलाबी चेंडूमुळे चाहते कसोटी क्रिकेट पाहण्यासाठी स्टेडियमकडे वळतील असे मला वाटते. त्याचप्रमाणे आपल्याला स्टेडियममधील शौचालये, आसने, पार्किंग यांसारख्या सुविधाही सुधारण्याची गरज आहे. तसे झाल्यास कसोटी सामन्यांना चाहत्यांची मोठी उपस्थिती लाभेल, असे द्रविड एका मुलाखतीत म्हणाला.

- Advertisement -

टी.व्ही, वेबसाईट्सचा फटका!

टी.व्ही आणि विविध वेबसाईट्सवर सामने पाहण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळेही चाहते स्टेडियममध्ये येत नाहीत, असे द्रविडने नमूद केले. २००१ मध्ये ईडन गार्डन्सवर झालेला कसोटी सामना पाहण्यासाठी एक लाख चाहते उपस्थित होते, कारण त्यावेळी टी.व्ही तितकेसे चांगले नव्हते. तसेच मोबाईलवरही सामने पाहता येत नव्हते. त्यामुळे चाहते सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये यायचे, असे द्रविडने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -