नीरज चोप्राची पहिल्याच प्रयत्नात फायनलमध्ये धडक, सुवर्णपदकासाठी सज्ज; व्हिडीओ व्हायरल

टोक्यो ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडल विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात फायनलमध्ये धडक मारली आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्रा पुन्हा एकदा सुवर्णपदकासाठी सज्ज झाला आहे. नीरजनं पहिल्याच प्रयत्नात आणि फक्त १२ सेकंदामध्ये फायनलमध्ये धडक मारली आहे.

नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर लांब भाला फेकला. अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राच्या इव्हेंटमध्ये एकूण ३४ खेळाडू सहभागी झाले आहेत. या खेळाडूंना दोन गटात विभागण्यात आले होते. दोन्ही गटातून सर्वोत्तम १२ जणांची अंतिम फेरीसाठी निवड केली गेली. आता २४ जुलै रोजी अंतिम फेरी होणार आहे. परंतु आता त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नीरजची सर्वोत्तम कामगिरी ही ८९.९४ मीटर इतकी आहे. गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजने देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या या स्टार खेळाडूने आता जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या पात्रता फेरीत देखील कमाल करून दाखवली. गेल्या हंगामात नीरजवर शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे त्याला भाग घेता आला नव्हता. तर २०१७च्या हंगामात तो अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. तेव्हा त्याने ८२.२६ मीटर थ्रो केला होता.

१४ जून रोजी फिनलँड येथे झालेल्या पावो नुर्मी स्पर्धेत त्याने ८९.३० त्यानंतर ३० जून रोजी स्टॉकहोम येथील डायमंड लीग स्पर्धेत ८९.९४ मीटर थ्रो केला होता. चांगली कामगिरी करूनही त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यावेळी एडरसन पीटर्सने ९०.३१ सह सुवर्णपदक जिंकले होते. दरम्यान, भारताला शेवटचं पदक वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये २००३ मध्ये अंजू बॉबी जॉर्जने मिळवून दिलं होतं. तिने लांब उडीत कांस्य पदकाची कमाई केली होती.


हेही वाचा : के. एल. राहुलला कोरोनाची लागण; वेस्ट इंडिज दौऱ्याला मुकणार?