घरक्रीडा‘नर्व्हस नाईन्टी’ची फिफ्टी!

‘नर्व्हस नाईन्टी’ची फिफ्टी!

Subscribe

शतक साजरे करून संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. मात्र, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी नशिबाची साथही कधी-कधी महत्त्वाची ठरते, अन्यथा सुरेख फलंदाजी करत शंभरीच्या जवळ पोहोचलेल्या फलंदाजाला एखादा अचूक टप्प्यावर पडलेला चेंडू किंवा स्वत:चीच घालमेल, तणाव तंबूचा रस्ता दाखवतो. ९० धावांनंतर म्हणजेच ‘नर्व्हस नाईन्टी’चे बळी ठरलेले फलंदाज शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांपेक्षा अधिक दुर्दैवी समजले जातात, हेही तितकेच खरे.

आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेच्या ४४ वर्षांच्या कालावधीत ५० फलंदाज नर्व्हस नाईन्टीचे बळी ठरले आहेत. यात सर्वाधिक खेळाडू (९) हे वेस्ट इंडिजचे आहेत. (इंग्लंड-अफगाण सामन्यापर्यंत) सर्वाधिक तीन वेळा भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज मायकल क्लार्क विश्वचषकात नर्व्हस नाईन्टीचे बळी ठरले. यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत चार फलंदाज नव्वदीत तंबूत परतले आहेत.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाचा नेथन कुल्टर-नाईल यंदाच्या पर्वातील नर्व्हस नाईन्टीचा पहिला बळी ठरला. ६ जूनला नॉटिंगहॅमच्या मैदानावर झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात शतकाच्या उंबरठ्यावर असताना विंडीजच्या कार्लोस ब्रेथवेटने त्याला जेसन होल्डरकरवी झेलबाद केले. त्याने ९२ धावांची खेळी केली. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हलच्या मैदानावर झालेल्या सामन्यात श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेला ९७ धावांवर रिचर्डसनने बाद केले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या शाई होपलादेखील मुस्तफिजूर रहेमानने ९६ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर मंगळवारी झालेल्या इंग्लंडविरुद्ध अफगाणिस्थान यांच्यातील सामन्यातही यजमान इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोला नव्वदी गाठताच गुलबदीन नाईबने बाद केले. त्याच्या रूपात यंदाच्या विश्वचषकातील चौथा आणि या स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासातील ५० वा नर्व्हस नाईन्टीचा बळी गेला.

१९९६ विश्वचषकात नवज्योतसिंग सिद्धूने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध केलेली ९३ धावांची खेळी कुठलाच भारतीय क्रिकेटप्रेमी विसरू शकणार नाही. २०११ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गौतम गंभीरने साकारलेली ९७ धावांची खेळी आजही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे. सचिन तेंडुलकरसारखा महान खेळाडूदेखील विश्वचषकात तीन वेळा नव्वदीत बाद झाला आहे. या तीनही खेळी विजयी योगदान देणार्‍या राहिल्या असल्या तरी वैयक्तिकरित्या सचिनसाठी त्या दुर्दैवीच ठरल्या आहेत. विश्वचषकातील अजून निम्मे सामने शिल्लक असून, यात आता कोण शतकी उंबरठा पार करतो आणि कुणाला शतकापर्यंत पोहोचण्यात दुर्दैवाचा धनी व्हावे लागते, हे पाहणे रंजक ठरेल.

- Advertisement -

यांचेही दुर्दैवच!

यंदाच्या विश्वचषकात बेन स्टोक (८९), अ‍ॅरॉन फिंच (८२), स्टिव्ह स्मिथ दोन वेळा ७३ धावा, विराट कोहली (७७), इव्हन लुईस (७०), हशमत्तुल्लाह शाहिदी (७६), जो रूट (८८) यांनीही शतकाकडे वाटचाल केली. मात्र, त्यांना ही खेळीचे रूपांतर शतकात करता आले नाही. बांगलादेशचा लिटन दासही वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ९४ वर नाबाद राहिला. अवघ्या सहा धावांनी त्याचे शतक अपूर्ण राहिले, पण विंडीजविरुद्ध मोठा विजय मिळवण्यात त्याची शाकिब अल हसनला लाभलेली साथ निर्णायक ठरली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -