घरक्रीडाजाफरला खुणावतायत अनोखे विक्रम!

जाफरला खुणावतायत अनोखे विक्रम!

Subscribe

रणजी करंडकाचा नवा मोसम आजपासून

भारतीय स्थानिक क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा रणजी करंडकाच्या नव्या मोसमाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत पुन्हा एकदा अनुभवी फलंदाज वसीम जाफरच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. ३१ कसोटी आणि दोन एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या जाफरला यंदाच्या मोसमात बरेच विक्रम करण्याची संधी आहे.

आधी मुंबई आणि त्यानंतर विदर्भाकडून जाफरने वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मागील रणजी मोसमात त्याने १०३७ धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर विदर्भाने सलग दुसर्‍यांदा रणजी करंडकावर आपले नाव कोरले होते. यंदाही दमदार कामगिरीचे त्याचे लक्ष्य असेल. या मोसमात विदर्भाचा पहिला सामना आंध्र प्रदेशविरुद्ध होणार असून हा जाफरचा १५० वा रणजी सामना असेल. ही कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरेल. तसेच तो यंदाच्या मोसमात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २० हजार धावांचा टप्पा पार करू शकेल. ४१ वर्षीय जाफरने आतापर्यंत १९१४७ धावा केल्या असून त्याला २० हजारचा टप्पा गाठण्यासाठी ८५४ धावांची गरज आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम त्याच्याच नावे आहे. क्षेत्ररक्षणात त्याने तीन झेल पकडल्यास तो रणजीमध्ये २०० झेप पकडणारा तो पहिला खेळाडू बनेल.

- Advertisement -

तसेच सौराष्ट्राचा चेतेश्वर पुजारा, कर्नाटकाचा मयांक अगरवाल आणि मुंबईचा अजिंक्य रहाणे न्यूझीलंड दौर्‍याआधी सराव मिळावा यासाठी सुरुवातीचे काही सामने खेळणार आहेत. मुंबईचा पहिला सामना बडोदाविरुद्ध होणार असून या सामन्यात रहाणेप्रमाणेच पृथ्वी शॉच्या कामगिरीकडेही सर्वांची नजर असेल.

पहिल्यांदा ३८ संघ!

रणजी करंडकाचा हा ८६ वा मोसम असून या स्पर्धेत पहिल्यांदाच ३८ संघ खेळणार आहेत. मागील मोसमात ३७ संघ खेळले होते, तर यंदा चंदीगड पहिल्यांदा रणजीमध्ये खेळणार आहे. यंदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी गतविजेत्या विदर्भासह कर्नाटक, सौराष्ट्र, तामिळनाडू, मुंबई यांसारख्या संघाना प्रबळ दावेदार मानले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -