घरक्रीडान्यूझीलंडने ‘अखेर’ विजय मिळवलाच

न्यूझीलंडने ‘अखेर’ विजय मिळवलाच

Subscribe

तिसर्‍या वन-डेत ८ विकेट राखून विजयी

अ‍ॅना पीटरसनच्या ४ विकेट तसेच सुझी बेट्स आणि एमी सॅटरवेट यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंड महिला संघाने तिसर्‍या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा ८ विकेट राखून पराभव केला. भारताने पहिले दोन सामने जिंकून ही मालिका आधीच आपल्या खिशात घातली होती. या पराभवामुळे भारताची महिला चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत दुसर्‍या स्थानावरून तिसर्‍या स्थानी घसरण झाली आहे, तर न्यूझीलंड पुन्हा दुसर्‍या स्थानी पोहोचला आहे.

या सामन्यात न्यूझीलंडची कर्णधार एमी सॅटरवेटने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि त्यांच्या गोलंदाजांनी भारताचा डाव १४९ धावांत संपवत कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. भारताच्या दीप्ती शर्मा (५२), हरमनप्रीत कौर (२४), हेमलथा (१३), जेमिमा रॉड्रिग्स (१२) आणि झुलन गोस्वामी (१२) यांच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही, तर न्यूझीलंडकडून अ‍ॅना पीटरसनने ४, लिया ताहूहूने ३ आणि अमेलिया करने २ विकेट घेतल्या.

- Advertisement -

१५० धावांचा पाठलाग करताना सलामीवीर लॉरेन डाऊन १० धावांतच माघारी परतली, पण यानंतर सुझी बेट्स आणि सॅटरवेट यांनी अप्रतिम फलंदाजी केली. बेट्सने ५७ तर सॅटरवेटने नाबाद ६६ धावांची खेळी केली, तसेच या दोघींनी ८४ धावांची भागीदारी केली. त्यामुळे न्यूझीलंडने हे आव्हान २९.२ षटकांत पूर्ण करत हा सामना जिंकला. आता या दोन संघांमध्ये ६ फेब्रुवारीपासून ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होईल.

संक्षिप्त धावफलक –

- Advertisement -

भारत : ४४ षटकांत सर्व बाद १४९ (दीप्ती शर्मा ५२, हरमनप्रीत कौर २४; अ‍ॅना पीटरसन ४/२८, लिया ताहूहू ३/२६) पराभूत वि. न्यूझीलंड २९.२ षटकांत २ बाद १५३ (एमी सॅटरवेट नाबाद ६६, सुझी बेट्स ५७, पूनम यादव १/३१).

मिताली राजचा विक्रमी २०० वा सामना

भारताची कर्णधार मिताली राजचा हा २०० वा एकदिवसीय सामना होता. महिला क्रिकेटमध्ये २०० एकदिवसीय सामने खेळणारी ती पहिली खेळाडू आहे. भारतीय महिला संघाने आतापर्यंत २६३ सामने खेळले आहेत. त्यापैकी २०० सामन्यांत मिताली खेळली आहे. यावरूनच तिचा विक्रम किती खास आहे याचा अंदाज येतो. मितालीने १९९९ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या २०० सामन्यांत मितालीने ५१.३३ च्या सरासरीने ६६२२ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या सामन्यानंतर मिताली म्हणाली, माझी कारकीर्द सुरू केली तेव्हा मी इतके सामने खेळीन याचा विचारही केला नव्हता. माझे मुख्य उद्दिष्ट भारतासाठी खेळणे आणि त्यानंतर संघाचा महत्त्वाचा भाग बनणे इतकेच होते. मी इतकी वर्षे खेळू शकेन, असे वाटले नव्हते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -