घरक्रीडा...तर पुढील वर्षीचे ऑलिम्पिक रद्द होईल!

…तर पुढील वर्षीचे ऑलिम्पिक रद्द होईल!

Subscribe

अध्यक्ष योशिरो मोरींचे विधान

करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जगातील सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धाही याला अपवाद नाही. करोनामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) ऑलिम्पिक एका वर्षाने पुढे ढकलणे भाग पडले. आता २०२० ऐवजी २०२१ मध्ये होणार्‍या या स्पर्धेला २३ जुलैपासून सुरुवात होईल. मात्र, तोपर्यंत करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश न आल्यास ऑलिम्पिक रद्द करावे लागेल, असे मत टोकियो २०२० चे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी व्यक्त केले.

निक्कन स्पोर्ट्स या जपानमधील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोरी यांना करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश न आल्यास ऑलिम्पिक २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात येऊ शकेल का, असे विचारले असता ते म्हणाले, नाही. करोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास ऑलिम्पिक रद्द केले जाईल. मात्र, या विषाणूवर नियंत्रण मिळवल्यास ऑलिम्पिक पुढील वर्षी शांतपणे पार पडेल.

- Advertisement -

टोकियो २०२० चे प्रवक्ते मासा टकाया यांनी मात्र ऑलिम्पिक रद्द होण्याबाबत काहीही बोलणे टाळले. मोरी यांनी जे विधान केले, ते त्यांचे स्वतःचे विचार होते, असे टकाया यांनी स्पष्ट केले.

लस न सापडल्यास ऑलिम्पिक अवघड!
करोना विषाणूवर परिणामकारक ठरणारी लस न सापडल्यास टोकियोला पुढील वर्षी ऑलिम्पिकचे आयोजन करणे अवघड जाईल, असे जपान मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष योशिताके योकोकुरा म्हणाले. जपानने ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवावे किंवा नाही, याबाबत मला काहीच बोलायचे नाही. मात्र, करोना विषाणूवर लस न सापडल्यास जपानला ऑलिम्पिकचे आयोजन करणे अवघड जाईल, असे योकोकुरा यांनी नमूद केले. ऑलिम्पिक एका वर्षाने पुढे गेल्यामुळे जपानला बरेच आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांनी या स्पर्धेसाठी १३ बिलियन डॉलर्स इतका खर्च केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -