दिल्लीच्या प्रदूषणाचा परिणाम नाही!

rohit sharma
रोहित शर्माचे उद्गार

भारताची राजधानी दिल्लीतील वातावरण सध्या प्रदूषित आहे. त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील दिल्ली येथे ३ नोव्हेंबरला होणारा पहिला टी-२० इतरत्र हलवण्यात यावा अशी मागणी होत आहे. मात्र, बीसीसीआयचा नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुलीने हा सामना दिल्लीतच होणार हे स्पष्ट केले आहे. तसेच दिल्लीतील प्रदूषणाचा खेळाडूंवर परिणाम होणार नाही, असे विधान रोहित शर्माने केले. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत रोहित भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

मी आताच दिल्लीत आलो आहे आणि मी येथील प्रदूषणाचा फारसा विचार केलेला नाही. माझ्या माहितीनुसार आमचा बांगलादेशविरुद्धचा सामना ३ नोव्हेंबरला होणार आहे आणि यात कोणताही बदल झालेला नाही. आम्ही काही काळापूर्वी श्रीलंकेविरुद्ध दिल्लीत कसोटी सामना खेळलो होतो आणि तेव्हा खेळाडूंना काही त्रास झाला नाही. त्यामुळे या सामन्याबाबत काय चर्चा होत आहे, हे मला ठाऊक नाही. मात्र, प्रदूषणामुळे मला त्रास जाणवलेला नाही आणि खेळाडूंवर परिणाम होईल असे वाटत नाही, असे रोहित म्हणाला.

भारत आणि श्रीलंका यांच्यात २०१७ साली दिल्लीत कसोटी सामना झाला होता. प्रदूषित हवेमुळे हा सामना जवळपास २० मिनिटे थांबवावा लागला होता. सध्या दिल्लीतील वातावरण प्रदूषित आहे. गुरुवारी दिल्लीत बांगलादेशचे सराव सत्र पार पडले. यात लिटन दासने मास्क घालून सराव केला. मात्र, त्याच्याव्यतिरिक्त इतर खेळाडूंना काही त्रास झाल्याचे दिसले नाही. तसेच लिटनने फलंदाजी करताना मास्क घातला नव्हता.