घरक्रीडाभारतीय संघातील स्थान टिकवण्याची चिंता नाही!

भारतीय संघातील स्थान टिकवण्याची चिंता नाही!

Subscribe

भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. त्याने या मालिकेत दोन अर्धशतकांसह १६४ धावा चोपून काढल्या. या मालिकेत सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत कर्णधार विराट कोहलीनंतर तो दुसर्‍या स्थानी राहिला. राहुलने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३४ सामन्यांत ४४ च्या सरासरीने ११३८ धावा केल्या आहेत.

सातत्यपूर्ण कामगिरी करूनही राहुलचे संघातील स्थान निश्चित नाही. डावखुर्‍या शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे राहुलला सलामीवीर म्हणून खेळायला मिळाले आणि त्याने या संधीचे सोने केले. मला जेव्हा संधी मिळते, तेव्हा मी संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो, असे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अखेरच्या सामन्यानंतर राहुल म्हणाला. तसेच मी आता संघातील स्थान टिकवण्याची चिंता करत नाही, असेही त्याने सांगितले.

- Advertisement -

संघातून सतत आत-बाहेर होणे कोणत्याही खेळाडूसाठी सोपे नसते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूंवर खूप दबाव असतो आणि हा दबाव कसा हाताळायचा हे समजण्यासाठी जरा वेळ लागतो. तसेच तुम्ही कोणत्याही संघाविरुद्ध अगदी सहजपणे धावा करू शकत नाही. मी आता संघातील स्थान टिकवण्याची चिंता करत नाही. मला प्रत्येक सामना खेळायला मिळेल अशी मी नक्कीच आशा करतो. मात्र, केवळ चांगली कामगिरी करणे माझ्या हातात आहे. मला जेव्हा संधी मिळेल, तेव्हा मी संघाला सामने जिंकवून देण्याचा आणि खेळपट्टीवर जास्तीतजास्त वेळ राहण्याचा प्रयत्न करतो, असे राहुल म्हणाला.

तसेच संघातून वगळण्यात आल्यानंतर निराशा होते का, असे विचारले असता राहुलने सांगितले, तुम्ही चुकीचा विचार करुन स्वतःसाठी गोष्टी अवघड करता. मी फार विचार करत नाही. मी खूप सराव करण्याचा आणि नेट्समध्ये वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो. मला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळायलाही आवडते. तिथे तुम्हाला स्वतःच्या शैलीत आणि फलंदाजीत सुधारणा करण्याची संधी मिळते.

- Advertisement -

राहुल, कोहलीला क्रमवारीत बढती

लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी विंडीजविरुद्धच्या टी-२० तिसर्‍या सामन्यात अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या दोघांचेही हे या मालिकेतील दुसरे अर्धशतक ठरले. या कामगिरीमुळे त्यांना आयसीसी टी-२० क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत बढती मिळाली आहे. राहुलला तीन स्थानांची बढती मिळाली असून तो सहाव्या स्थानी पोहोचला आहे. त्याच्या खात्यात ७३४ गुण आहेत. तसेच कर्णधार कोहलीनेही अव्वल दहा फलंदाजांत प्रवेश केला आहे. तो ६८५ गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -