घरक्रीडाआता वेळ युवकांची !

आता वेळ युवकांची !

Subscribe

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना गुरुवारी होणार आहे. भारताने ५ सामन्यांच्या या मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकत मालिकाही जिंकली आहे. कर्णधार विराट कोहलीला या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. तसेच, इतर खेळाडूंनाही विश्रांती मिळण्याची शक्यता असल्याने या दोन्ही सामन्यांत शुभमन गिल, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज या युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, हा सामना रोहित शर्मासाठीही खास असणार आहे. रोहितचा हा २०० वा एकदिवसीय सामना असणार आहे आणि कोहलीच्या अनुपस्थित तोच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्याचे त्याचे लक्ष्य असेल.

भारताने हा सामना जिंकला तर भारताला या मालिकेत ४-० अशी आघाडी मिळेल. जर तसे झाले तर न्यूझीलंडमधील हा भारताचा सर्वात मोठा मालिका विजय असेल. भारताने १९६७ साली पहिल्यांदा न्यूझीलंडचा दौरा केला होता. त्यानंतर ५२ वर्षांत भारताला एकदाही एकाच मालिकेतील (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) ४ सामने जिंकता आलेले नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलंडमध्येही भारताला ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी आहे.

- Advertisement -

या मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात भारताने ७ विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी खेळू शकला नव्हता, पण चौथ्या सामन्यात तो संघात परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यात त्याची कोहलीच्या जागी निवड होऊ शकेल किंवा जर भारताने युवा शुभमन गिलला संधी देण्याचा निर्णय घेतला तर धोनीऐवजी तिसर्‍या सामन्यात खेळलेल्या दिनेश कार्तिकला आपले संघातील स्थान गमवावे लागू शकेल. गिलने यंदा रणजी चषकात अप्रतिम प्रदर्शन केले आहे. तो चांगल्या फॉर्मातही आहे. त्यामुळे त्याला संधी मिळाली तर तो या संधीचे सोने करण्याच्या हेतूने मैदानात उतरेल.

तसेच गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेपासून सलग सामने खेळणार्‍या मोहम्मद शमीला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर खलील अहमद किंवा मोहम्मद सिराजला संधी मिळण्याची शक्यता आहे. खलीलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला होता. या सामन्यात त्याने ८ षटकांत ५५ धावा दिल्या होत्या. तर याच मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात खलीलऐवजी सिराजला संधी मिळाली होती. त्याने या सामन्यात १० षटकांत ७६ धावा दिल्याने पुढील सामन्यांत त्याला संधी मिळालेली नाही. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या सामन्यात या दोघांना संधी मिळू शकेल.

- Advertisement -

न्यूझीलंडने या मालिकेत चांगले प्रदर्शन केलेले नाही. त्यांच्या एकाही खेळाडूला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे अखेरच्या दोन सामन्यांसाठी त्यांनी अष्टपैलू जिमी निशम आणि टॉड अ‍ॅस्टल यांची संघात निवड केली आहे. या दोघांच्या समावेशामुळे संघाच्या कामगिरीत सुधारणा होईल अशी त्यांना आशा असेल.

सामन्याची वेळ – सकाळी ७:३० पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी

न्यूझीलंडच्या टी-२० संघात दोन नवोदित

पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडने बुधवारी आपल्या संघाची घोषणा केली. या संघात अष्टपैलू डॅरेल मिचेल आणि वेगवान गोलंदाज ब्लेयर टिकनर यांची निवड झाली आहे. मिचेलची तिन्ही सामन्यांसाठी तर टिकनरची केवळ अखेरच्या सामन्यासाठी निवड झाली आहे.

न्यूझीलंड संघ – केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, रॉस टेलर, टीम सायफर्ट (यष्टीरक्षक), डॅरेल मिचेल, कॉलिन डी ग्रँडहोम, डग ब्रेसवेल, स्कॉट कुगलायन, टीम साऊथी, मिचेल सॅन्टनर, ईश सोधी, लोकी फर्ग्युसन (पहिले २ सामने), ब्लेयर टिकनर (तिसरा सामना).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -