भारतीय पुरुष संघाची अंतिम फेरीत धडक

ऑलिम्पिक हॉकी चाचणी स्पर्धा

उपकर्णधार मनदीप सिंगच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यात यजमान जपानवर मात करत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारताची न्यूझीलंडशी गाठ पडेल. याआधी रविवारी झालेल्या दुसर्‍या साखळी सामन्यात न्यूझीलंडने भारताला २-१ असे नमवले होते. त्यामुळे भारताला ही स्पर्धा जिंकण्यासाठी अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.

मंगळवारी झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ६-३ असा पराभव केला. भारताकडून या सामन्यात मनदीपने तीन (९, २९ आणि ३० वे मिनिट), नीलकांत शर्मा (तिसरे मिनिट), नीलम संजीप (सातवे मिनिट) आणि गुरजंत सिंग (४१ वे मिनिट) यांनी गोल केले.

या सामन्याची भारताने दमदार सुरुवात केली. तिसर्‍याच मिनिटाला नीलकांत शर्माने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी दुप्पट करायला भारताला आणखी चार मिनिटेच वाट पहावी लागली. सातव्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्यावर नीलम संजीपने गोल केला. नवव्या मिनिटाला मनदीपने त्याचा पहिला आणि संघाचा तिसरा गोल केला. त्यामुळे १० मिनिटांच्या आतच भारताला ३-० अशी आघाडी मिळाली. यानंतर जपानने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. २५ व्या मिनिटाला केंटारो फुकुडाने जपानचे गोलचे खाते उघडले. मात्र, मध्यंतराआधी भारताचा उपकर्णधार मनदीपने आणखी दोन गोल करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. त्यामुळे मध्यंतराला भारताकडे ५-१ अशी मोठी आघाडी होती.

मध्यंतरानंतर जपानने आक्रमक खेळ केला. जपानच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी भारताच्या बचावफळीवर दबाव टाकल्याचा त्यांना ३६व्या मिनिटाला फायदा मिळाला. केंटा टनाकाने गोल करून भारताची आघाडी २-५ अशी कमी केली. मात्र, ५ मिनिटांनंतर गुरजंतने गोल करून भारताला पुन्हा ४ गोलची आघाडी मिळवून दिली. चौथ्या सत्रात जपानने ५२ व्या मिनिटाला त्यांचा तिसरा गोल झाला. त्यांच्याकडून हा गोल कुझमा मुराटाने केला. मात्र, यानंतर त्यांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे भारताने हा सामना ६-३ असा जिंकत अंतिम फेरी गाठली.

महिला संघही फायनलमध्ये

पुरुष संघाप्रमाणेच भारताच्या महिला संघानेही ऑलिम्पिक हॉकी चाचणी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मंगळवारी झालेल्या भारत आणि चीन यांच्यातील अखेरच्या साखळी सामन्यात गोलशून्य बरोबरी झाली. जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी असणार्‍या चीनला गोल करण्याच्या संधी मिळाल्या, पण भारताची गोलरक्षक सवितापुढे त्यांची डाळ शिजली नाही. त्यामुळे ३ सामन्यांनंतर ५ गुणांसह भारताने अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत भारताचा सामना यजमान जपानशी होईल.