घरक्रीडाऑलिम्पिक पात्रता फेरी २ स्पर्धा

ऑलिम्पिक पात्रता फेरी २ स्पर्धा

Subscribe

भारतीय महिला फुटबॉल संघाने ऑलिम्पिक पात्रतेच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश करण्याची संधी वाया घालवली. दुसर्‍या फेरीतील मंगळवारी झालेल्या सामन्यात म्यानमारने भारताला ३-३ असे बरोबरीत रोखले. गट ’अ’ मध्ये समावेश असणार्‍या भारताला या गटात अव्वल स्थान मिळवण्यासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य होते.

पण, भारताला तसे करण्यात अपयश आले आणि त्यांना या स्पर्धेतून बाहेर जाण्याची नामुष्की ओढवली. प्रत्येक गटातील अव्वल स्थानी असणारे संघच पुढील फेरीत प्रवेश करू शकणार आहेत. पात्रतेच्या दुसर्‍या फेरीत भारत आणि म्यानमार यांचे प्रत्येकी तीन सामन्यांनंतर ७-७ गुण आहेत. मात्र, म्यानमारचा गोल फरक (+८) भारतापेक्षा (+४) सरस असल्याने त्यांनी पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

- Advertisement -

म्यानमारविरुद्धच्या या सामन्याची सुरुवात भारताने आक्रमक खेळ करत केली. याचा फायदा त्यांना १० व्या मिनिटालाच मिळाला, जेव्हा संध्या रंगनाथनने गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी भारताला ७ मिनिटेच टिकवता आली. सामन्याच्या १७ व्या मिनिटाला विन टूनने गोल करत म्यानमारला १-१ अशी बरोबरी करून दिली, तर टूननेच पुन्हा २१ व्या मिनिटाला गोल करत म्यानमारला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

पण, ३२ व्या मिनिटाला संजूने भारताचा दुसरा गोल करत सामन्यात २-२ अशी बरोबरी केली. मध्यंतराला २-२ अशी बरोबरी कायम राहिली. यानंतर ६४ व्या मिनिटाला रतनबाला देवीने गोल करून भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ७२ व्या मिनिटाला टूनने आपला आणि म्यानमारच्या तिसरा गोल केला. त्यामुळे हा सामना ३-३ असा बरोबरीतच संपला. भारत सध्या जागतिक क्रमवारीत ६२ व्या स्थानी आहे. मात्र, ४२ व्या स्थानी असलेल्या म्यानमार संघाला त्यांनी चांगली झुंज दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -