Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा आजच्याच दिवशी, १६ वर्षांपूर्वी महेंद्रसिंग धोनीने केलेली 'ही' कामगिरी

आजच्याच दिवशी, १६ वर्षांपूर्वी महेंद्रसिंग धोनीने केलेली ‘ही’ कामगिरी

धोनीने पाकिस्तानविरुद्ध १४८ धावांची खेळी केली होती.

Related Story

- Advertisement -

महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारच नाही, तर सर्वोत्तम यष्टीरक्षक-फलंदाज म्हणूनही ओळखला जातो. धोनीने २००४ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, पहिल्या काही सामन्यांत तो चांगली कामगिरी करू शकला नव्हता. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना त्याने ०, १२, नाबाद ७ आणि ३ धावा केल्या होत्या. मात्र, पाचव्या एकदिवसीय सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली आणि या संधीचा फायदा घेताना त्याने ५ एप्रिल २००५ रोजी म्हणजे आजच्याच दिवशी १६ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने विखाखापट्टणम येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १२३ चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १४८ धावांची खेळी केली.

द्रविडसोबत १४९ धावांची भागीदारी

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताची १ बाद २६ अशी अवस्था होती. मात्र, धोनीने आधी विरेंद्र सेहवागच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची, तर चौथ्या विकेटसाठी राहुल द्रविडसोबत १४९ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताने ५० षटकांत ९ बाद ३५६ अशी धावसंख्या उभारली आणि याचा पाठलाग करताना पाकिस्तानला २९८ धावाच करता आल्या.

एकदिवसीय कारकिर्दीत १० शतके

- Advertisement -

धोनीचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच शतक ठरले. त्याने एकदिवसीय कारकिर्दीत एकूण ३५० सामने खेळले आणि त्यात त्याने १० शतकांच्या मदतीने १०,७७३ धावा फटकावल्या. तसेच त्याच्या नेतृत्वात भारताने २००७ टी-२० आणि २०११ एकदिवसीय असे दोन वर्ल्डकप जिंकले. त्यामुळे धोनी हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.

- Advertisement -