भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. ऑलिम्पिकपासून राष्ट्रकुल खेळापर्यंत देशाला गौरव मिळवून देणाऱ्या या खेळाडूने तिच्या लग्नाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ती कुणाला डेटही करत नव्हती. महिनाभरात त्यांचे लग्नही ठरले. बॅडमिंटन कोर्टवर जगातील अनेक दिग्गजांना पराभूत करणारी ही सुपरस्टार आता नववधू झाली आहे. रविवारी लखनौ येथील सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेत विजेतेपदाचा दुष्काळ संपवणारी माजी विश्वविजेती सिंधू हिचे हैदराबादमध्ये स्थित असणाऱ्या व्यंकट दत्ता साई यांच्याशी लग्न झाले.
सिंधूचे नाव आतापर्यंत कोणाशीही जोडलेले नव्हते. तिच्या नात्याची कोणतीही बातमी नाही आणि तिने कोणाला डेटही केले नाही. सिंधूने नेहमीच तिच्या करिअरला प्राधान्य दिले.
सिंधूचे पती व्यंकट दत्ता हे साई पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहेत. सिंधूचे वडील पीव्ही रमणा यांनी सांगितले की, “दोन्ही कुटुंबे एकमेकांना ओळखत होती पण एक महिन्यापूर्वीच सर्व काही ठरले. ही एकमेव वेळ आम्हाला लग्नासाठी उत्तम वाटली कारण जानेवारीपासून तिचे वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे.”
ती लवकरच तिचे प्रशिक्षण सुरू करणार आहे कारण पुढचे सत्र खूप महत्त्वाचे असणार आहे.
असे झाले सिंधूचे लग्न :
20 डिसेंबरला सिंधूच्या लग्नसोहळ्याला संगीतमय कार्यक्रमाने सुरुवात झाली. यानंतर 21 डिसेंबर रोजी हळदी, पेल्लीकुथुरू आणि मेहंदीचे विधी पूर्ण झाले. मुख्य विवाह सोहळा उदयपूरमध्ये झील महल, लीला महल आणि जग मंदिर या तीन वेगवेगळ्या ठिकाणी पार पडला. या सोहळ्याच्या सजावटीत राजस्थानी रॉयल टच दिसत होता. प्रत्येक पाहुण्याला बोटीने कार्यक्रमस्थळी नेण्यात आले. पाहुण्यांसाठी राजस्थानी आणि मेवाडी जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली होती. पीव्ही सिंधूने क्रीम रंगाची साडी नेसली होती, तर व्यंकट साई दत्ताने मॅचिंग शेरवानी परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
व्यंकट दत्ता साई यांची शैक्षणिक पात्रता :
व्यंकट दत्ता साई हे एक यशस्वी उद्योजक आहेत. फायनान्स, डेटा सायन्स आणि ॲसेट मॅनेजमेंट या क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी फाउंडेशन ऑफ लिबरल अँड मॅनेजमेंट एज्युकेशनमधून लिबरल आर्ट्स अँड सायन्सेस/लिबरल स्टडीजमध्ये डिप्लोमा केला आहे. याशिवाय त्यांनी फ्लेम युनिव्हर्सिटीमधून बीबीए (अकाउंटिंग अँड फायनान्स) आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बंगलोर येथून डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.
नेट वर्थ किती आहे ?
मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2023 पर्यंत पीव्ही सिंधूची एकूण संपत्ती यूएस डॉलरप्रमाणे 7.1 दशलक्ष होती. म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे 59 कोटी रुपये. त्याचबरोबर व्यंकट दत्ता साई यांची एकूण संपत्ती सुमारे 150 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
सिंधूची कारकीर्द :
सिंधू ही भारतातील सर्वात दिग्गज खेळाडूंपैकी एक मानली जाते जिने 2019 मध्ये सुवर्णासह जागतिक स्पर्धेत पाच पदके जिंकली आहेत. याशिवाय तिने ऑलिम्पिक स्पर्धेतही रौप्य आणि कांस्यपदक जिंकले आहेत. या चॅम्पियन बॅडमिंटनपटूने रिओ 2016 आणि टोकियो 2020 मध्ये सलग ऑलिम्पिक पदके जिंकली आणि 2017 मध्ये सर्वोत्तम जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले.
हेही वाचा : Health Tips : या पदार्थांनी करा शुगर क्रेविंग कंट्रोल
Edited By – Tanvi Gundaye