गौरवास्पद : सिंगापूर ओपनचे जेतेपद मिळवत पी. व्ही. सिंधूने घडवला इतिहास

सिंगापूर : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद मिळवून इतिहास घडवला आहे. आज झालेल्या सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम लढतीमध्ये सिंधूने चीनच्या वँग झी यी हिचा पराभव केला. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली असून यामुळे समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.

दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधू आणि चीनची वँग झी यी यांच्यातील ही लढत अत्यंत चुरशीची झाली. सिंधूसाठी जागतिक क्रमवारीत ११व्या क्रमांकावर असलेल्या वांग जी यीला पराभूत करणे सोपे नव्हते. सुमारे ५७ मिनिटे चाललेल्या या सामन्याची सुरुवात सिंधूने विजयाने केली. तिने पहिला गेम २१-९ असा एकहाती जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र वँगने जोरदार लढत दिली. तो गोम वॅगने २१-११ असा जिंकला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे तिसऱ्या गेमची चुरस वाढली. सुरुवातीच्या ८-१० गुणांपर्यंत दोन्ही खेळाडूंमध्ये बरोबरीची लढत होती. पण सिंधूने नंतर चमकदारी खेळ करत हा गेम २१-१५ असा जिंकला. २१-९, ११-२१, २१-१५ असा हा सामना जिंकून सिंधूने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

याआधी उपांत्य फेरीत पी. व्ही. सिंधूने जपानच्या बिगरमानांकित सायना कावाकामीचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. २१-१५, २१-७ अशा फरकाने तिने सहज विजय मिळवला होता. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या पी. व्ही. सिंधूचे यंदाच्या हंगामातील हे तिसरे विजेतेपद आहे. यावर्षी सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्विस ओपन अशी दोन सुपर पदके जिंकली आहेत.

फडणवीस यांच्याकडून कौतुक
सिंगापूर ओपनचे जेतेपद पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं आहे. पी. व्ही. सिंधूने भारतासाठी सुखद बातमी दिली आहे. तिने पुन्हा एकदा आपली मान अभिमानाने उंचावली आहे. सिंगापूर ओपनचे पदक जिंकल्याबद्दल पी. व्ही. सिंधू तुझे अभिनंदन, असे ट्वीट त्यांनी केले आहे.