आशिया चषक 2023 च्या सुपर-4 च्या महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीतील आपलं स्थान पक्क केलं आहे. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका झालेल्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर पाकिस्तान पराभूत झालं आणि अत्यंत चूरशीची झालेली ही लढत श्रीलंकेनं जिंकली आणि फायनलमध्ये धडक मारली. डीएलएसच्या नियमांनुसार, या सामन्यात श्रीलंकेसमोर 252 धावांचं लक्ष्य होतं, जे त्यांनी केवळ 42 षटकांत पूर्ण केलं. संघाच्या या विजयात कुसल मेंडिसनं फलंदाजी करताना महत्त्वाची भूमिका बजावत 91 धावांची शानदार खेळी केली, तर चारिथ असलंकानंही 49 नाबाद धावा केल्या. आता 17 सप्टेंबरला भारत विरुद्ध श्रीलंका अशी आशिया चषकाच्या जेतेपदासाठी लढत होणार आहे. (PAK Vs SL Thrilling Pakistan out of Asia Cup on last ball SriLanka reach the final)
श्रीलंकेसाठी हा विजय कठीण वाटत होता. शेवटच्या षटकात 8 धावा करायच्या होत्या, ज्यात पहिल्या 3 चेंडूत फक्त 2 धावा झाल्या होत्या. चौथ्या चेंडूवर श्रीलंकेनं आपली आठवी विकेट गमावली. आता श्रीलंकेला विजयासाटी शेवटच्या 2 चेंडूत 6 धावा करायच्या होत्या. असलंकानं पाचव्या चेंडूवर चौकार लगावला आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावा घेत संघाला अंतिम फेरीत नेलं.
पाकिस्तानने ठेवलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग श्रीलंकेनं जोमानं सुरू केला. कुशल परेराने शाहीन शाह आफ्रिदीला 3 कडक चौकार मारून आशा वाढवल्याच. पण धाव काढू की नको या द्विधा अवस्थेत तो धावबाद झाला. त्यानंतर कुशल मेंडीस आणि सदीराने शतकी भागीदारी केली त्यामुळे श्रीलंकेचा विजय शक्य वाटू लागला. पण त्यानंतर सदीरा, कॅप्टन शनका आणि धनंजया बाद झाले. 41 व्या षटकात शाहीन आफ्रिदीने फक्त 4 धावा देत दोन फलंदाजांना बाद केलं. असं असलं तरीदेखील असलांकानं डोकं शांत ठेवून शेवटच्या षटकात गरजेच्या 8 धावा काढून सामना आपल्या खिशात घातला. श्रीलंकेनं अंतिम सामन्यात प्रवेश केला.
आता 17 सप्टेंबरला भारत विरुद्ध श्रीलंका सामना होणार आहे. आशिया चषकातील या फायनलकडे आता श्रीलंकन आणि भारतीय क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे.
(हेही वाचा: Pakistan vs Sri Lanka : मोहम्मद रिझवानची दमदार खेळी; पाकिस्तानचे श्रीलंकेसमोर 253 धावांचे आव्हान )