नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे देण्यात आले होते. पण, असे असतानाही पाकिस्तानच्या संघाने ढिसाळ कामगिरी केली आणि ग्रुप स्टेजमध्येच हा संघ स्पर्धेबाहेर गेला. अशामध्ये एकीकडे सध्या खेळत असलेल्या पाकिस्तानच्या संघामध्ये दोन गट झालेले समोर आले असून आता माजी क्रिकेटपटूदेखील दोन गटात विभागले असल्याचे समोर आले आहे. 90 च्या दशकातील खेळाडू आणि त्यानंतर 2000 नंतर पाकिस्तानच्या संघात समाविष्ट झालेल्या खेळाडूंमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. नुकतेच पाकिस्तानचे माजी कर्णधार रशीद लतीफ आणि मोहम्मद हाफीज यांनी वकार युनूस आणि वसीम अक्रम यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. आता त्यावर वकार युनूसने ट्विट करत निशाणा साधला. (Pakistan Cricket after losing in Champions Trophy 2025 waqar younis wasim akram hits back at rashid latif hafeez)
हेही वाचा : ST bus : एसटीला निधी देताना सरकारचा आखडता हात, काँग्रेसच्या नेत्याने केले हे आरोप
नेमकं प्रकरण काय?
पाकिस्तान संघ फक्त चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनच नव्हे तर 2023च्या एकदिवसीय विश्वचषक तसेच 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या फेरीतूनही बाहेर पडला होता. यावेळी रशीद लतीफने 90 च्या दशकातील दिग्गजांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्याने नाव न घेता वसीम अक्रम आणि वकार युनूससारख्या महान खेळाडूंना लक्ष्य केले. तसेच, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) 1992च्या विश्वचषक विजेत्या संघाला व्यवस्थापनापासून दूर ठेवण्याची विनंती केली होती. पाकिस्तानच्या एका वाहिनीवर तो म्हणाला की, 90 च्या दशकातील खेळाडूंनी पाकिस्तान क्रिकेटला सोडले नाही. म्हणून पाकिस्तानला दुसरा विश्वचषक म्हणजेच 2009 टी-20 WC जिंकण्यासाठी 17 वर्षे लागली. 90 च्या दशकातील खेळाडूंना व्यवस्थापन आणि संघापासून दूर ठेवा. तो बऱ्याच काळापासून पाकिस्तान क्रिकेटची सेवा करत आहे. तर, मला वाटते त्याने आता आराम करावा.” असा टोला लगावला. तसेच, कोणाचेही नाव न घेता माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना ‘दुबई के लौंडे’ (दुबईचे मुले) म्हटले. तसेच, एका यूट्यूब चॅनलमध्ये लतीफ म्हणाला की, या दुबईतील मुलांनी कहर केला. दोघेही एकमेकांचे कौतुक करून आनंदी होत आहेत. आम्ही आयुष्यभर लढलो आणि आम्हाला आगीत टाकण्यात आले. हे अद्भुत लोक आहेत. त्यांच्यासमोर पैसे फेकून द्या, ते काहीही करतील.” अशा शब्दात टीका केली.
वकार युनूसचा पलटवार
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वकार युनूसने ट्विट करत रशीद लतीफच्या टीकेला उत्तर दिले. यामध्ये तो म्हणाला आहे की, “90 च्या दशकातील मुलगा. 191 कसोटी, 618 एकदिवसीय सामने, 1705 विकेट्स, 8594 धावा, एका डावात 5 विकेट्स 66 वेळा, कसोटीमध्ये 10 विकेट्स 10 वेळा. ते वाईट नाही.” यामध्ये वकार युनुसने त्याची कारकीर्द आणि वसीम अक्रमचे आकडे एकत्र करून लिहिले. असे म्हणत त्याने नाव न घेता टोला लगावला आहे. वसीम अक्रमने पाकिस्तानकडून 104 कसोटी आणि 356 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीमध्ये 414 विकेट्स आणि 2898 धावा आहेत. वसीम अक्रमने एकदिवसीय सामन्यांत 502 विकेट्स आणि 3717 धावा केल्या. त्याने कसोटीमध्ये 25 वेळा 5 विकेट्स आणि एकदिवसीय सामन्यात 6 वेळा 5 विकेट्स घेतल्या. तर, वकारने पाकिस्तानकडून 87 कसोटी आणि 262 एकदिवसीय सामने खेळले. त्याच्या नावावर कसोटीत 373 विकेट्स आणि 1010 धावा आहेत. तर एकदिवसीय सामन्यात त्याने 416 विकेट्स घेतल्या आणि 939 धावा केल्या. वकारने कसोटीत 22 वेळा 5 विकेट्स आणि एकदिवसीय सामन्यात 13 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. या दोघांच्या गोलंदाजीला जगातील अनेक फलंदाज घाबरत होते.
शोएब अख्तरचे हाफिजला उत्तर
पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनलवरील डिबेटमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनेदेखील या वादात उडी घेतली. “भारताविरुद्ध पाकिस्तानचा 90च्या दशकापासून चांगला रेकॉर्ड आहे. नंतर हा रेकॉर्ड खराब होत गेला, यात काही शंका नाही. इम्रान खानच्या काळापासून आमचा वारसा खूप मजबूत आहे. त्याच्या काळात काही उत्तम क्रिकेटही खेळले गेला.” असे म्हणत त्याने हाफिजच्या टीकेवर उत्तर दिले. 1990च्या दशकात वसीम अक्रम आणि वकार युनुससोबत एक शोएब अख्तरचे त्रिकुट होते.