आशिया चषक 2023 ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशात खेळवली जाणार आहे. या दोन्ही देशांकडे आशिया चषकाचं यजमानपद आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आशिया चषकादरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापण्यात आलंय. ( Pakistan name is on Indian team jersey in Asia Cup 2023 know the reason )
आशिया चषक 2023 स्पर्धा 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवली जाणार आहे. BCCI ने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्यानंतर ACC ने ही स्पर्धा पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाकिस्तानात 4 आणि श्रीलंकेत 9 सामने होणार आहेत. आशिया चषकाचे सामने दोन देशांत होणार असले तरीही यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे नियमानुसार, सहभागी संघांना त्यांच्या जर्सीवर यजमान देशांचं नावं लिहिणं बंधनकारक आहे. त्यामुळेच भारतीय संघाच्या जर्सीवर आशिया चषक 2023 च्या लोगोसह यजमान पाकिस्तानचं नावही छापण्यात आलं आहे.
भारत- पाकिस्तान महामुकाबला कधी?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा महामुकाबला श्रीलंकेतील कँडीमध्ये खेळवला जाणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी स्टेडियम हाऊसफुल्ल झाले आहेत. जर दोन्ही संघ सुपर-4 साठी पात्र ठरले तर दोघांमध्ये आणखी एक सामना पाहायला मिळेल. सुपर-4 व्यतिरिक्त अंतिम फेरीतही दोघांमध्ये टक्कर होऊ शकते. अशाप्रकारे आशिया चषकात भारत-पाकिस्तान एकदाच नव्हे तर तीन वेळा आमनेसामने येऊ शकतात.
( हेही वाचा: विश्वचषकाआधी ईडन गार्डन स्टेडियममध्ये लागली आग, BCCIची वाढली चिंता )
आशिया चषकाचा अंतिम सामनाही श्रीलंकेत
30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात पाकिस्तानातील मुल्तान इथे खेळवला जाणार आहे. यानंतर बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना यजमान श्रीलंकेत होणार आहे. याशिवाय या स्पर्धेचा अंतिम सामनाही श्रीलंकेत होणार आहे. स्पर्धेतही बहुतांश सामने श्रीलंकेमध्येच खेळवले जाणार आहेत.
आशिया चषकाचं वेळापत्रक
- 30 ऑगस्ट- पाकिस्तान वि नेपाळ, मुलतान
- 31 ऑगस्ट- बांगलादेश वि. श्रीलंका, कँडी
- 2 सप्टेंबर- पाकिस्तान वि. भारत, कँडी
- 3 सप्टेंबर- बांगलादेश वि. अफगाणिस्तान, लाहोर
- 4 सप्टेंबर- भारत वि. नेपाळ, कँडी
- 5 सप्टेंबर- श्रीलंका वि अफगाणिस्तान, लाहोर
- 6 सप्टेंबर- ( सुपर-4)
- 9 सप्टेंबर- ( सुपर-4)
- 10 सप्टेंबर -( सुपर-4)
- 12 सप्टेंबर -( सुपर-4)
- 14 सप्टेंबर -( सुपर-4)
- 15 सप्टेंबर -( सुपर-4)
- 17 सप्टेंबर – फायनल