नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात झाली असली तरी जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे भारत आणि पाकिस्तान सामन्यावर लक्ष लागून राहिले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम दोन्ही संघ 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वाजता आमनेसामने येणार आहेत. यंदा पाकिस्तानकडे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद होते, मात्र भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलअंतर्गत खेळवण्यात येत आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान सामन्याला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र या सामन्याआधीच पाकिस्तानला फखर झमानच्या रुपात मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे पाकिस्तानने आता त्याच्या जागी वरिष्ठ खेळाडूला संघात स्थान दिले आहे. (Pakistan replaces Fakhar Zaman with Imam-ul-Haq)
फखर झमान दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे पाकिस्तान संघासाठी हा मोठा धक्का आहे. कराची येथे झालेल्या पाकिस्तानच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पहिल्या षटकात क्षेत्ररक्षण करताना अनाठायी पडल्याने फखरला दुखापत झाली. वैद्यकीय तपासणीनंतर, फखर काही काळासाठी मैदानात परतला परंतु त्याच्या तंदुरुस्तीबद्दल शंका निर्माण झाल्याने त्याला पुन्हा मैदान सोडावे लागले. त्यानंतरच्या स्कॅनमध्ये दुखापतीची तीव्रता निश्चित झाली, त्यामुळे त्याला आता स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. डावखुऱ्या फलंदाजाने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून उर्वरित स्पर्धेतून माघार घेतल्याची घोषणा केली. फखर झमानच्या जागी पाकिस्तान संघाने वरिष्ठ खेळाडू इमाम उल हकला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे आता इमाम उल हकला भारताविरुद्धच्या सामन्यात संधी मिळते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा – IND VS PAK : कोणता संघ जिंकणार? आयआयटी बाबाच्या भविष्यवाणीमुळे चाहत्यांचा संताप
भारताविरुद्ध सामना जिंकणे पाकिस्तानसाठी महत्त्वाचे
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध 60 धावांनी पराभव पत्करावा लागला. 321 धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना मेन इन ग्रीन संघ 260 धावांतच गारद झाला. तर दुसरीकडे भारतीय संघाने बांग्लादेशविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवत पहिल्याच सामन्यात आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा पराभव केल्यास ते 4 गुणांसह स्पर्धेत पुढे जातील. त्यामुळे पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचणे जवळजवळ अशक्य होईल. त्यामुळे पाकिस्तान संघ भारताविरुद्ध कसे प्रदर्शन करतो हे पाहावे लागेल.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दोन्ही संघ
- भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत , हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
- पाकिस्तान संघ : बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आघा, मोहम्मद रिजवान, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह , शाहीन शाह आफ्रिदी.