आधी दहशतवाद थांबवा, मग नुकसान भरपाई मागा ! – अनुराग ठाकूर

अनुराग ठाकूर यांनी पाकिस्तानने आधी दहशतवादी कारवाया थांबवाव्यात आणि मग नुकसान भरपाई मागावी असे विधान केले आहे.  

अनुराग ठाकूर
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने बीसीसीआयवर द्विदेशीय मालिकेसाठी झालेल्या कराराचा आदर न केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांनी आयसीसीकडे बीसीसीआयविरुद्ध याचिका दाखल केली होती. मात्र, आयसीसीने नेमलेल्या समितीला भारताची बाजू पटल्यामुळे त्यांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळाची याचिका फेटाळून लावली. आयसीसीने दिलेल्या या निर्णयाचे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी स्वागत केले आहे. तसेच त्यांनी पाकिस्तानने आधी दहशतवादी कारवाया थांबवाव्यात आणि मग नुकसान भरपाई मागावी असा टोलाही लगावला.

निर्णयाचे स्वागत  

आयसीसीच्या निर्णयाबद्दल अनुराग ठाकूर म्हणाले, “मी आयसीसीने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने बीसीसीआयकडे केलेला नुकसान भरपाईचा दावा तथ्यहीन होता. त्यामुळेच आयसीसीने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. अशा नुकसान भरपाई मागणाऱ्या याचिका करण्यापेक्षा पाकिस्तानने दोन देशांमधील संबंध कसे सुधारतील याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच त्यांनी त्यांच्या देशात चालणाऱ्या दहशतवादी कारवायाही थांबवल्या पाहिजेत.”

दोन देशांमध्ये ६ मालिका होणे अपेक्षित  

पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या म्हणण्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विदेशीय मालिकेसाठी करार झाला होता. त्यानुसार २०१५ ते २०२३ या कालावधीत दोन देशांमध्ये ६ मालिका होणे अपेक्षित होते. पण या कराराचा बीसीसीआयने मान न राखल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने नुकसान भरपाई म्हणून ४४७ करोड रुपयांची मागणी केली होती.