PAK vs BAN : पाकिस्तानच्या विजयाची हॅट्रीक; ३-० च्या फरकाने बांगलादेशला केले चितपट

पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने ५ गडी राखून विजय मिळवला

पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने ५ गडी राखून विजय मिळवला. सोबतच पाकिस्तानने ही मालिका ३-० च्या फरकाने आपल्या नावावर केली. पहिल्या सामन्यापासून खराब प्रदर्शन करणाऱ्या बांगलादेशने तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात कडवी झुंज देत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला विजयासाठी २ धावांची गरज होती आणि मोहम्मद नवाजने चौकार मारत पाकिस्तानच्या विजयाची हॅट्रीक केली. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात बांगलादेशने २० षटकांत ७ बाद १२४ धावा करून पाकिस्तानला १२५ धावांचे आव्हान दिले.

बांगलादेशच्या सलामीवीर नईमने सर्वाधिक ४७ धावा करून करून संघाचा शंभरचा आकडा पार करण्यात हातभार लावला. तर त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियर आणि उस्मान कादीर यांनी प्रत्येकी २-२ बळी पटकावले.

बांगलादेशची कडवी झुंज

छोट्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला संघाच्या अवघ्या ३२ धावांवर पहिला झटका बसला. यानंतर हैदर अली आणि रिझवान यांनी सावध खेळी करत अर्धशतकीय भागीदारी केली. लक्षणीय बाब म्हणजे रिझवान बाद झाल्यानंतर लगेचच पाकिस्तानचे फलंदाज बाद होत गेले. मात्र नवाजने पाकिस्तानला पराभवापासून वाचवले. बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाहने शेवटच्या षटकात तीन बळी घेत सामन्यात रंगत आणली. पण शेवटच्या षटकात बांगलादेशला ८ धावा वाचवायच्या होत्या मात्र शेवटच्या चेंडूवर २ धावा पाहिजे असताना पाकिस्तानच्या फलंदाजाने चौकार मारून मालिकेतील शेवटच्या सामन्यात देखील विजय मिळवला.

रिझवान ठरला मालिकावीर

मालिकेत शानदार प्रदर्शन करणाऱ्या मोहम्मद रिझवानला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने तीन सामन्यांत ९० धावा केल्या आणि २ सामन्यात ५ झेल पकडले. दरम्यान तिसऱ्या सामन्यात ४५ धावा करणाऱ्या हैदर अलीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.


हे ही वाचा: Syed Mushtaq Ali Trophy Final : शाहरूख खानचा सिक्सर, तामिळनाडूने पटकावले विजेतेपद; कर्नाटकचा केला पराभव