घरक्रीडापंतला डच्चू, साहाची एंट्री

पंतला डच्चू, साहाची एंट्री

Subscribe

भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला मागील काही काळात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पंतला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या संघातून वगळण्यात आले आहे. त्याची जागा अनुभवी वृद्धिमान साहा घेणारा आहे, अशी घोषणा मंगळवारी भारताचा कर्णधार विराट कोहलीने केली. साहाला दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर रहावे लागले होते. मात्र, फिट झाल्यानंतर त्याची वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली होती, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

साहा आता पूर्णपणे फिट झाला आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात तो यष्टिरक्षण करेल. तो किती उत्कृष्ट यष्टीरक्षक आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. तसेच त्याने वेळोवेळी फलंदाजीतही उत्तम कामगिरी केली आहे. त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर रहावे लागले, हे दुर्दैव आहे. माझ्या मते, साहा जगातील सर्वोत्तम ‘यष्टीरक्षक’ आहे. या सामन्यातील परिस्थिती पाहता, तो आमच्यासाठी या मालिकेची सुरुवात करेल, असे कर्णधार कोहली म्हणाला.

- Advertisement -

जानेवारी २०१८ मध्ये आपला अखेरचा कसोटी सामना खेळणार्‍या साहाला खांदा आणि त्यानंतर अंगठ्याच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर रहावे लागले. त्याच्या अनुपस्थितीत पंतला संधी मिळाली. पंतने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतके झळकावली, पण त्यानंतर त्याचा फॉर्म खालावला. त्यामुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागले आहे. याबाबत कोहलीने सांगितले, रिषभला आम्ही बर्‍याच संधी दिल्या आणि त्याने चांगली कामगिरी केली. मात्र, साहा फिट झाल्यानंतर संघात पुनरागमन करेल हे आमचे ठरले होते. तो यष्टीरक्षण उत्तम करत होता, फलंदाजी चांगली करत होता.

परंतु, त्याला आम्हाला थोडा वेळ द्यायचा होता. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नाही. आम्हाला रिषभलाही अजून काही सामने खेळायला द्यायचे होते, कारण त्याने आधी अप्रतिम कामगिरी केली आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये केवळ यष्टीरक्षक म्हणून साहा संघात परतावा, असे आम्हाला वाटत होते.

- Advertisement -

रोहितचे यश संघाच्या फायद्याचे!

कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा सलामीवीर म्हणून खेळणार्‍या रोहित शर्माला कर्णधार विराट कोहलीने पाठिंबा दर्शवला आहे. रोहितला सलामीवीर म्हणून यश मिळाले, तर ते संघाच्या फायद्याचे असेल. आमच्या फलंदाजीची आघाडीची फळी अधिक मजबूत होईल. त्याच्यासारख्या खेळाडूला प्रत्येक सामना न खेळवणे अवघड आहे. त्याला आम्ही पुरेशी मोकळीक देणार आहोत. कसोटी क्रिकेटमध्ये कारकिर्दीच्या सुरुवातीला मी सहाव्या स्थानावर खेळायचो, पण नंतर मी चौथ्या क्रमांकावर खेळण्यास सुरुवात केली. मला मानसिकतेत थोडा बदल करावा लागला. कसोटी क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या वातावरणानुसार खेळात बदल करणे आवश्यक असते. त्यामुळे रोहित विशिष्ट पद्धतीने खेळेल, अशी आम्हाला अपेक्षा नाही. त्याला वीरू भाईप्रमाणे (सेहवाग) आक्रमकपणे खेळायला आवडते, असे कोहली म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -