Cricket Australia : तब्बल ६५ वर्षानंतर वेगवान गोलंदाज कर्णधारपदी, ऑस्ट्रेलियाचा नवा कसोटी कर्णधार घोषित

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सची कसोटी कर्णधारपदी निवड केली आहे तर स्टीव्ह स्मिथकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे

टीम पेनच्या राजीनाम्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधाराबाबत सतत चर्चा होत होती. चेंडू टॅम्परिंग प्रकरणात अडकलेल्या स्टीव्ह स्मिथचे नावही समोर आले होते. मात्र आता सर्व चर्चांना पूर्णविराम देत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सची कसोटी कर्णधारपदी निवड केली आहे. तर स्टीव्ह स्मिथकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. पुढील महिन्यात ८ डिसेंबरपासून इंग्लंडसोबत होणार्‍या अॅशेज मालिकेला लक्षात घेऊन या खेळांडूच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे पॅट कमिन्स हा दुसरा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज आहे ज्याला कसोटीत कर्णधारपद देण्यात आले आहे. यापूर्वी १९५६ मध्ये रे लिंडवॉल यांनी भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले होते.

दरम्यान पॅट कमिन्स सध्या जागतिक पातळीवर नंबर एकचा कसोटी गोलंदाज आहे. तो संपूर्ण मालिकेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासावर नजर टाकली तर प्रसिद्ध फिरकीपटू रिची बेनॉडनंतर २८ वर्षीय कमिन्स हा पहिला पूर्णवेळ कसोटी कर्णधार असणार आहे. बेनॉडच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियान संघाने एकूण २८ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी संघाला १२ सामने जिंकण्यात यश आले. त्यामधील 11 सामने अनिर्णित तर 1सामना बरोबरीचा राहिला आहे आणि 4 सामन्यात संघाचा पराभव झाला होता.

पॅट कमिन्स सध्या फक्त ऑस्ट्रेलियातीलच नाही तर संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. कसोटी क्रमवारीत तो अव्वल क्रमांकावर असून त्याचे फलंदाजीही कमालीची आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी ३५ कसोटी सामने खेळले आहेत ज्याच्यात त्याने २१.५९च्या सरासरीनुसार १६४ बळी घेतले आहेत.

दरम्यान लक्षणीय बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा महत्त्वाच भाग असलेल्या टीम पेनने शुक्रवारी सांगितले होते की, टीम पेन अनुपस्थितीमुळे आगामी इंग्लंडविरूध्च्या अॅशेज मालिकेत खेळणार नाही. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.