घरक्रीडाखेळ आता पहिल्यासारखे राहणार नाहीत!

खेळ आता पहिल्यासारखे राहणार नाहीत!

Subscribe

खेळाडूंना आताच्या परिस्थितीत खेळायचं म्हटलं, (आणि अनेकांची तसं खेळायचीही तयारी आहे) तर बर्‍याच बदलांना सामोरं जावं लागणार आहे. कारण त्यांच्यावर मैदानात अथवा कोर्टवर असताना वागण्याबाबत काही निर्बंध येणार आहेत. खेळांमध्ये, नियमांमध्ये प्रसंगानुरूप बदल करावे लागतात, हे तर सर्वांनाच माहित आहे. आताही तसे करावे लागतील. तसे ते बदल झाले की, खेळाडूंना त्यांच्या काही जुन्या सवयी सोडाव्या लागतील. त्यांना बदलांशी जुळवून घ्यावं लागणार आहे.

हिंदी चित्रपटातलं बदले बदले मेरे सरकार नजर आते है… हे गाणं सुंदरच आहे. सध्या घरामध्ये आणि सुरक्षित अंतरावर राहण्याच्या या काळात, अशा असंख्य गाण्यांचाच तर आधार वाटतो. पण नेमकं आताच ते का आठवावं, असा प्रश्न पडला. लगेच उत्तरही मिळालं. ते कारण म्हणजे खेळांमध्ये कोणकोणते बदल होणे शक्य आहे, वा करावे लागतील याबाबतच्या येणार्‍या बातम्या. तर सांगायचं असं की, सध्या प्रत्यक्ष खेळांच्या स्पर्धा, सामने बंद असले, तरी खेळांबाबतच्या बातम्या येतच आहेत. खेळांच्या स्पर्धांचं भवितव्य काय, ऑलिम्पिक, विश्वचषक, ग्राँ-प्री यांसारख्या महत्त्वाच्या आणि ज्याच्याकडं क्रीडाप्रेमी डोळे लावून बसलेले असतात, अशा विविध स्पर्धांचं काय होणार, याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.

काही जण जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत, प्रसिद्ध खेळाडूंच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या जात आहेत, कुणाला त्यांच्या दिनक्रमाबाबत विचारलं जातंय, तर कुणी सामाजिक माध्यमांवरून आपली अवस्था आणि मतं सांगत आहेत. कुणी आपापले सर्वोत्तम संघ निवडत आहे. ते वाचतानाही मजा येते. कारण प्रत्येकाच्या मनात त्यानं निवडलेला संघ असतोच आणि मग ज्या कुणाच्या संघाबरोबर तो जुळेल, त्याला कसं अगदी बरोबर समजतं, असं वाटणारे काही कमी नाहीत. काही जण मात्र सार्वकालिक संघ निवडण्याच्या भानगडीत पडतच नाहीत, कारण तेथे एक तर असंख्यांमधून निवड करावी लागते आणि अर्थातच ती करणं खूपच अवघड असतं. समजा केलीच तर वादंगाला खूप वाव असतो. म्हणून मग ते ठराविक काळातला अथवा स्वतः खेळत होते त्या काळातला, असे संघ निवडतात. त्यातही त्यांची आवड नावडही काही प्रमाणात दिसते म्हणा!

- Advertisement -

यात काय विशेष, असं तुम्हाला वाटेल. पण जे खेळाचं विश्लेषण करत वा त्यावर टीकाटिप्पणी करत, त्यांना हा बदल म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखाच वाटत असेल. पण शेवटी कशाने का असेना, तहान भागल्याशी कारण, असं म्हणून ते योग्य वेळ येण्याची वाट बघत असतील. दुसरं म्हणजे हा बदल काही एवढ्यावरच थांबलेला नाही. खेळाडूंना आताच्या परिस्थितीत खेळायचं म्हटलं, (आणि अनेकांची तसं खेळायचीही तयारी आहे) तर बर्‍याच बदलांना सामोरं जावं लागणार आहे. कारण त्यांच्यावर मैदानात अथवा कोर्टवर असताना वागण्याबाबत काही निर्बंध येणार आहेत. त्यामुळं स्वतःच्या सवयीही त्यांना बदल्याव्या लागणार आहेत. तसं ते थोडं अवघडच जाईल म्हणा. पण त्यांना त्याच्याबरोबर जुळवून घ्यावंच लागेल. निदान काही काळ तरी!

खरं म्हणजे सर्वच खेळाडूंना आता, म्हणजे जवळपास दोन महिने, नुसतं स्वस्थ बसणं असह्य झालंय. बहुधा त्यामुळंच त्यांनी प्रेक्षकांशिवाय अगदी रिकाम्या स्टेडियममध्येदेखील खेळण्याची तयारी दाखवली आहे. काहीही करा, पण आम्हाला खेळू द्या, असं त्यांचं म्हणणं दिसतंय. काहींना अजूनही हे फारसं भावलेलं दिसत नाही. पण पुढं मागं त्यांनाही ते स्वीकारावंच लागेल… म्हणजे करोनाचं हे संकट लवकर टळलं नाही तर!

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून कुठंकुठं लहान प्रमाणात हे प्रयोग सुरूही झाले आहेत. (त्याआधीच अनेकांनी ऑनलाईन सामने वा स्पर्धा सुरूही केल्या आहेत आणि बुद्धिबळाची तर जागतिक ऑनलाइन स्पर्धा सुरू झाली आहे) खेळांमध्ये, नियमांमध्ये प्रसंगानुरूप बदल करावे लागतात, हे तर सर्वांनाच माहित आहे. आताही तसे करावे लागतील. तसे ते बदल झाले की, खेळाडूंना त्यांच्या काही जुन्या सवयी सोडाव्या लागतील. आपला आनंद प्रकट करायचे मार्गही बदलावे लागतील हे त्यांना हळूहळू उमगत आहे. त्यांना बदलांशी जुळवून घ्यावं लागणार आहे.

म्हणजे कितीही झालं तरी आता क्रिकेटमध्ये गोलंदाजांना चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकी वा घामाचा वापर करता येणार नाही, (त्याऐवजी खास मेण तयार करण्याची सुरुवातही झाली आहे). फलंदाजांना वारंवार क्रीझच्या मध्ये जवळ येऊन बातचीत करता येणार नाही. टेनिस, बॅडमिंटन यांसारख्या खेळांमध्ये सामन्याआधी प्रतिस्पर्ध्याबरोबर हस्तांदोलन नाही, सामना संपल्यावर प्रतिस्पर्ध्याला कवेत घेऊन दिलासा देणंही नाही. फुटबॉलसारख्या सांघिक खेळात गोल केल्यावर जल्लोष करताना एकमेकांच्या अंगावर उड्या घेणं नाही, तसंच प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंबरोबर जर्सीची अदलाबदल करणंही अवघडच बनणार आहे.

क्रिकेटमध्ये कुणी बळी मिळवला, तर त्याच्या अभिनंदनासाठी सर्वांनी, म्हणजे जवळपास क्षेत्ररक्षण करणारे तर सोडाच पण सीमारेषेवरूनदेखील क्षेत्ररक्षक धावून येऊन त्याला मिठ्या मारणं आता दिसणार नाही. टेनिस खेळाडूंना चेंडू वा टॉवेल देण्यासाठी बॉल बॉइज-गर्ल्स नसतील. अर्थात खेळापुढं या गोष्टींना खेळाडूंच्या दृष्टीनं फारसं महत्त्व नाही. कारण खेळाडूचं पहिलं प्रेम म्हणजे खेळ आणि खेळच असतं, तिथं मात्र तडजोड, पर्याय अजिबात नाही!

तुम्ही म्हणाल, खेळाडूंचं ठीक आहे, आमचं काय! आमचा विचार कुणीच करणार नाही का? खेळ, खेळाडूंचं कौशल्य आम्हाला बघायला मिळणारच नाही का? मग त्यावर चर्चा वादंग कसा होणार? आजच्या युगात खरं तर असे प्रश्न पडायला नकोत. तुम्ही फ्रेंच ओपन, विम्बल्डन, ऑल इंग्लंड बॅडमिंटन, विश्वचषक, ऑलिम्पिक आणि अन्य महत्त्वाच्या स्पर्धा आवर्जून बघता. आयपीएलच नाही, तर आपल्या तसेच इतर देशांतील अशा टी-२० स्पर्धा पाहायला तुम्हाला आवडतं ना? भारत कोणाबरोबरही कोठेही खेळत असला तरी ते तुम्ही आवर्जून पाहता ना? याचं उत्तर सर्वांनाच पुरेपूर ठाऊक आहे. तुम्हाला हे कसं शक्य होतं- दूरचित्रवाणीमुळं(टीव्ही). ते तर आपल्याला लाभलेलं वरदान आहे. नुसतं सामन्यांची वर्णनं ऐकणं केव्हाच मागं पडलंय. कारण आता प्रत्यक्ष तिथं असल्याएवढ्या चांगल्या प्रकारं आपल्याला हे सारं पाहायला मिळतंय! बरोबर नां?

आता एक सांगा, या सर्व स्पर्धा, सामन्यांच्या ठिकाणी तुम्ही असता का? रागावू नका. पण तरीही आपण तेवढ्याच उत्सुकतेनं ते सारं बघतो ना? मग सामने, स्पर्धा भरगच्च स्टेडियममध्ये असोत किंवा रिकाम्या स्टेडियममध्ये. आपल्याला खेळ बघायला मिळतोय ना, बाकी काही का असेना, असाच विचार आपण करणार ना? तंत्राचाच विषय निघालाय म्हणून सांगतो, आजकाल तंत्रज्ञान किती विकसित झालं आहे, हे आपल्याला चित्रपटच काय मालिकांमधूनही पाहायला मिळतंय. या तंत्रज्ञांनी ठरवलं, तर सामने भले रिकाम्या स्टेडियममध्ये होवोत, ते पडद्यावर तुम्हाला भरगच्च स्टेडियम दाखवू शकतात, प्रेक्षकांच्या घोषणा, आरोळ्या सारं तुम्हाला ऐकवू शकतात आणि ते तुम्हाला कळणारही नाही, अशी शिताफी त्यात असते. अर्थात हे काही नसलं आणि फक्त खेळ आणि खेळाडूंवरच कॅमेरे असले तर फारच चांगलं. कारण खेळ, खेळाडूंचं कौशल्य पाहण्यात खरं सुख आहे. बाकी हे उत्सवी वातावरण असलं काय आणि नसलं काय… खरं ना?

एक प्रश्न उपस्थित होईल. खेळाडूंना पैसे मग कसे मिळतील? शिवाय स्पर्धा आयोजनाचा, खेळाडूंच्या सरबराईचा संघटकांचा खर्च कसा भरून निघेल? पण आजच्या काळात हे प्रश्न फोल ठरतात. कारण प्रायोजक आणि दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्या. ही जमात स्पर्धा, सामने कधी होतात याच्याच प्रतीक्षेत असते. प्रायोजकांना त्यांची जाहिरात करता येते तर वाहिन्यांना आरामात तासनतास प्रक्षेपण कसलं करायचं ही चिंताच राहात नाही. भले स्टेडियमवर प्रेक्षक नसोत, त्यांचे घरोघरचे अगणित प्रेक्षक तर असतातच ना! आणि ते प्रेक्षक असतात म्हणून तर त्यांना जाहिराती मोठ्या प्रमाणावर मिळतात. (त्या वाहिन्यांना प्रक्षेपणाचे हक्क विकून मिळणार्‍या पैशानं आयोजकांचीही चिंता दूर होते) आणि स्टेडियमवरच्या जाहिरातीही हे चित्रवाणीचे प्रेक्षक बघत असतात. त्यामुळे तेथेही जाहिरातदार पुढे येणारच. भले त्यांचे प्रमाण थोडे कमी होईल इतकेच. पण तरीही त्यांची उत्पादने सुरू होतील, तेव्हा या जाहिरातींचा आपल्याला फायदाच होईल हे त्यांना पक्के माहीत असणार.

एक मात्र खरं. प्रत्यक्ष मैदानावर वा स्टेडियममध्ये जाऊन सामने, स्पर्धा पाहणंच खरं, असं समजणारे चाहते मात्र गुणगुणत राहतील…जो बात तुझमें है, तेरी तसबीर में नही …

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -