घरक्रीडाश्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराची स्तुती

श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराची स्तुती

Subscribe

भारताचा कर्णधार विराट कोहलीने मागील वर्षी उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे त्याने आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला होता, तसेच त्याला सर्वोत्तम एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटपटूचाही पुरस्कार मिळाला होता. हे तिन्ही मानाचे पुरस्कार एकाच वर्षी मिळवणारा तो पहिला क्रिकेटपटू होता. कोहलीसोबत न्यूझीलंडचा केन विल्यम्सन, ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ आणि इंग्लंडचा जो रूट या चौघांना जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखले जाते, पण श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू कुमार संगकाराच्या मते या चौघांमध्येही कोहलीचा स्तर वेगळा आहे.

विराट कोहलीची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. त्याचा स्तर इतरांपेक्षा वेगळा आहे. त्याच्या खेळातील सर्वकाही उत्कृष्ट आहे. पुढील विचार केला तर मला वाटते की तो कारकीर्द संपेपर्यंत क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असेल. त्याची धावांची भूक फारच उल्लेखनीय आहे. त्याच्याकडे खूप आत्मविश्वास आहे, तसेच त्याला आपला खेळ पूर्णपणे माहीत आहे. त्याची खेळण्याची पद्धत कधीही बदलत नाही. मग ते कसोटी क्रिकेट असो की एकदिवसीय की टी-२०. त्याला कोणत्या परिस्थितीत कसे खेळायचे याची चांगलीच कल्पना आहे, असे संगकारा म्हणाला. कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ६४ शतके लगावली आहेत.

- Advertisement -

संगकाराचा माजी श्रीलंकन सहकारी महेला जयवर्धने यानेही कोहलीचे कौतुक केले आहे. कोहलीमध्ये किती क्षमता आहे हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, त्याच्यावर जो १३० करोड भारतीयांच्या अपेक्षांचा दबाव आहे, त्याचा तो मैदानात आणि मैदानाबाहेर ज्याप्रकारे सामना करतो ते खूपच वाखाणण्याजोगे आहे. मी आणि सचिन (तेंडुलकर) एकाच पिढीतील आहोत. त्यालाही या अपेक्षांचा सामना करावा लागला होता आणि आता ते कोहलीला अनुभवायला मिळत आहे, असे जयवर्धने कोहलीविषयी म्हणाला.

मी भारतीय कर्णधाराचा चाहता – शेन वॉर्न

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नने आपण भारतीय कर्णधार विराट कोहलीचा चाहता असल्याचे म्हटले आहे. मला कोहलीला खेळताना पहायला तसेच तो काय बोलतो हे ऐकायला आवडते. मी त्याचा चाहता आहे. तो त्याला हवे ते बोलतो. तो कोणालाही घाबरत नाही. तो खूप खरा आहे. तो त्याच्या भावना कधीही लपवत नाही, उलट कधीकधी जरा जास्तच दाखवतो, पण हेच त्याला खास बनवते. त्यामुळे कोहली मलाच नाही तर पूर्ण क्रिकेट विश्वालाच आवडतो, असे वॉर्न म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -