घरक्रीडाप्रीमियर लीग : मँचेस्टर युनायटेडची चेल्सीवर मात

प्रीमियर लीग : मँचेस्टर युनायटेडची चेल्सीवर मात

Subscribe

स्ट्रायकर मार्कस रॅशफोर्डने केलेल्या २ गोलच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमियर लीगमधील सामन्यात चेल्सीला ४-० असे पराभूत केले. प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील हा दोन्ही संघांचा पहिलाच सामना होता, तर फ्रँक लॅम्पार्डच्या मार्गदर्शनात खेळण्याची ही चेल्सीची पहिली वेळ होती. मात्र, त्याच्या संघाला विजयी सुरुवात करण्यात अपयश आले. मँचेस्टर युनायटेडचा चेल्सीवरील हा मागील ५४ वर्षांतील सर्वात मोठा विजय होता.

या सामन्यात चेल्सीने युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आणि या खेळाडूंनी याचे दबाव न घेता सुरुवात केली. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला २१ वर्षीय टॅमी अ‍ॅब्राहमला गोल करण्याची संधी मिळाली. मात्र, त्याने मारलेला फटका गोल पोस्टला लागला. यानंतर मँचेस्टर युनायटेडने त्यांच्या खेळात सुधारणा केली. १७ व्या मिनिटाला चेल्सीच्या कर्ट झ्युमाने युनायटेडच्या रॅशफोर्डला पेनल्टी बॉक्समध्ये अयोग्यरित्या पाडले. त्यामुळे युनायटेडला पेनल्टी मिळाली.

- Advertisement -

यावर रॅशफोर्डने गोल करत मँचेस्टर युनायटेडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. चेल्सीने दुसर्‍या बाजूला आपला चांगला खेळ सुरू ठेवला. सामन्याच्या ३९ व्या मिनिटाला रॉस बार्कलीने जोरदार फटका मारला, पण तो फटका युनायटेडचा गोलरक्षक डेविड ड गेयाच्या थेट हातात गेला. पुढच्याच मिनिटाला एमर्सनने मारलेला फटका पुन्हा गोल पोस्टला लागला. त्यामुळे मध्यंतराला चेल्सी ०-१ असे पिछाडीवर होते.

मध्यंतरानंतर मँचेस्टर युनायटेडने दमदार सुरुवात केली. सामन्याच्या ६५ व्या मिनिटाला युनायटेडने प्रतिहल्ला केला आणि त्यामुळे त्यांना गोल करण्याची संधी मिळाली. या संधीचा उपयोग करत अँथनी मार्शियालने गोल केला. यानंतर २ मिनिटांनी पॉल पोग्बाच्या अप्रतिम पासवर रॅशफोर्डने केलेल्या गोलमुळे युनायटेडला ३-० अशी आघाडी मिळाली. सामन्याच्या ८१ व्या मिनिटाला युनायटेडसाठी पहिला सामना खेळणार्‍या डॅनियल जेम्सने गोल केला. त्यामुळे त्यांनी हा सामना ४-० असा जिंकला.

- Advertisement -

रविवारचे निकाल :
न्यूकॅसल युनायटेड ०-१ आर्सनल
लेस्टर सिटी ०-० वोल्व्हस
मँचेस्टर युनायटेड ४-० चेल्सी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -