मुंबई : युवा फलंदाज पृथ्वी शॉ सध्या अतिशय वाईट टप्प्यातून जात आहे. तंदुरुस्ती आणि खराब कामगिरीमुळे त्याला प्रत्येक संघातून सतत वगळले जात आहे. रणजी ट्रॉफीमधून वगळल्यानंतर, आयपीएल 2025 मेगा लिलावातही पृथ्वी शॉवर एकाही संघाने बोली लावली नाही. पृथ्वी शॉसोबत घडणाऱ्या या गोष्टींवर आता त्याचे बालपणीचे प्रशिक्षक संतोष पिंगुटकर यांनी एका मुलाखतीदरम्यान, भाष्य केले आहे. (Prithvi Shaw childhood coach Santosh Pingutkar expresses displeasure over his poor condition)
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत संतोष पिंगुटकर यांना पृथ्वी शॉच्या वाईट टप्प्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, पृथ्वी शॉची त्याच्या खेळाशिवाय इतर सर्व गोष्टींमध्ये वाढ झाली होती. तो क्रिकेट सोडून त्याच्या इतर ग्रुप्समध्ये अधिक सामील होतो. परंतु, त्याला क्रिकेट आवडते यात शंका नाही. परंतु असे असले तरी खेळावरील प्रेमाचे त्याच्या प्रयत्नांमध्ये रूपांतर तो करू शकला नाही. त्यामुळेच तो अशा बॅड पॅचमधून जात आहे. त्यामुळे त्याने लवकरात लवकर पुनरागमन करावे. कारण तो फक्त 25 वर्षांचा आहे. अजूनही त्याच्या हातात बराच मोठा काळ आहे. जर त्याला क्रिकेटमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर त्याला पुनरागमन करावेच लागेल, असे संतोष पिंगुटकर म्हणाले.
हेही वाचा – IND VS JPN U19 : कर्णधार मोहम्मद अमानचे दमदार शतक; जपानसमोर 340 धावांचे आव्हान
पृथ्वी शॉला दिले विनोद कांबळीचं उदाहरण
दिल्ली कॅपिटल्स संघाचे माजी प्रशिक्षक प्रवीण आमरे यांनीही पृथ्वी शॉच्या बॅड पॅचवर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, तीन वर्षांपूर्वीच मी त्याला विनोद कांबळीचं उदाहरण दिल होतं. मी विनोद कांबळीची अधोगती फार जवळून पाहिली आहे. परंतु आजच्या युवा पिढीला काही गोष्टी शिकवणं सोपं नाही. दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिटेन करून नशीबाचं सोनं करण्याची संधी दिली होती. 23 वर्षांचा असताना त्याने 30 ते 40 कोटी कमावले असतील. पण जेव्हा तुम्ही इतक्या कमी वयात पैसा कमावता, तेव्हा भरकटण्याची शक्यता असते. कारण पैशांचं व्यवस्थापन कसं करायचं, हे तुम्हाला माहिती नसतं. याशिवाय चांगले मित्र असणं, क्रिकेटला प्राधान्य देणंही गरजेचं आहे. त्याच्यासारख्या चांगल्या खेळाडूची अधोगती पाहणं हे फार वाईट आहे. कदाचित तो प्रसिद्धी, पैसा आणि आयपीएलचे दुष्परिणाम हाताळू शकला नाही. त्याचं जे झालं, ते इतर क्रिकेटपटूंच्या बाबतीत घडू नये, असे मतं प्रवीण आमरे यांनी मांडले.
हेही वाचा – WTC Final : अंतिम सामन्यासाठी भारतासमोर ही समीकरणे; 4 संघ शर्यतीत