Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Vijay Hazare Trophy : पृथ्वीच्या द्विशतकामुळे मुंबईची विजयाची हॅटट्रिक; पुदुच्चेरीचा उडवला धुव्वा

Vijay Hazare Trophy : पृथ्वीच्या द्विशतकामुळे मुंबईची विजयाची हॅटट्रिक; पुदुच्चेरीचा उडवला धुव्वा

मुंबईने याआधी दिल्ली आणि महाराष्ट्राचा पराभव केला होता.

Related Story

- Advertisement -

कर्णधार पृथ्वी शॉने केलेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर मुंबईने विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेच्या सामन्यात पुदुच्चेरीचा २३३ धावांनी धुव्वा उडवला. हा मुंबईचा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय ठरला. याआधी मुंबईने या स्पर्धेत दिल्ली आणि महाराष्ट्राचा पराभव केला होता. गुरुवारी झालेल्या पुदुच्चेरीविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार आणि युवा सलामीवीर पृथ्वीने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने नाबाद २२७ धावा चोपून काढल्या. भारतीय स्थानिक एकदिवसीय सामन्यात कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. याआधी हा विक्रम संजू सॅमसनच्या नावावर होता. त्याने २०१९ मध्ये गोवाविरुद्ध २१२ धावांची खेळी केली होती.

मुंबईची विक्रमी धावसंख्या

पुदुच्चेरीविरुद्धच्या या सामन्यात पृथ्वीने १५२ चेंडूत ३१ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद २२७ धावांची खेळी केली. हे पृथ्वीचे एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक ठरले. पृथ्वीला सूर्यकुमार यादवची उत्तम साथ लाभली. सूर्यकुमारने अवघ्या ५८ चेंडूत २२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १३३ धावांची खेळी केली. तसेच पृथ्वी आणि सूर्यकुमारने मिळून तिसऱ्या विकेटसाठी २०१ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे मुंबईने ५० षटकांत ४ बाद ४५७ अशी धावसंख्या उभारली. भारतीय स्थानिक क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.

प्रशांत सोळंकीच्या ५ विकेट

- Advertisement -

४५८ धावांचा पाठलाग करताना पुदुच्चेरीचा डाव २२४ धावांत संपुष्टात आला. कर्णधार दामोदरन रोहित (६३) आणि सागर त्रिवेदी (४३) यांनी चांगली फलंदाजी केली. मात्र, त्यांना इतरांची साथ लाभली नाही. मुंबईकडून प्रशांत सोळंकीने ५ विकेट, तर शार्दूल ठाकूर आणि तुषार देशपांडे यांनी २-२ विकेट घेतल्या.

- Advertisement -