अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत मागील चार दिवसांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र केसरीसाठी अंतिम लढत सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात पार पडली. या सामन्यात महेंद्र गायकवाडने मैदान सोडल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हा 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला आहे. (Prithviraj Chavan wins the 67th Maharashtra Kesari Competition)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धा पार पडली. माती विभागातील अंतिम सामना सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात झाला. या सामन्यात महेंद्र गायकवाड याने साकेत यादवचा पराभव केला. यानंतर गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात पार पडली. दोघांमध्ये अटीतटीचा झाला. यानंतर पृथ्वीराज मोहोळ याच्या एका डावात शिवराज राक्षे हा पाठीवर आला. यावेळी पंचांनी शिवराज राक्षेला बाद केले. मात्र पंचांनी चुकीच्या पद्धतीने पराभूत केल्याचे म्हणत शिवराज राक्षेने नाराजी व्यक्त केली. माझी पाठ टेकलीच नाही, असे म्हणत त्याने रिव्ह्यू मागितला. मात्र तोपर्यंत पृथ्वीराज मोहोळ याला विजयी करण्यात आले होते. यानंतर पंचांनी आपला निर्णय कायम ठेवल्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अंतिम लढत माती विभागातील विजयी झालेल्या महेंद्र गायकवाड आणि पुणे जिल्ह्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्यात पार पडली.
हेही वाचा – Maharahstra Kesari : कुस्ती स्पर्धेला गालबोट, पराभवानंतर शिवराज राक्षेने पंचांना मारली लाथ
जवळपास पाच मिनिटे चाललेल्या सामन्यात पृथ्वीराज मोहोळने पहिला पॉईंट घेत सामन्यात आघाडी घेतली. यानंतर काही प्रेक्षकांनी सामन्यादरम्यान गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करून त्यांना बाजूला केले. पुन्हा सामन्याला सुरुवात झाल्यानंतर महेंद्र गायकवाडने पहिला पॉईंट घेतला आणि सामना बरोबरीत आणला. मात्र पृथ्वीराज मोहोळने पुन्हा एकदा एक पॉईंट घेत सामन्यात आघाडी घेतली. याचदरम्यान, पुन्हा एकदा काहीसा गोंधळ झाला आणि महेंद्र गायकवाडने मैदान सोडले. त्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पृथ्वीराज मोहोळला चांदीची गदा आणि थार गाडी भेट म्हणून दिली. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
हेही वाचा – Abhishek Sharma : अभिषेक शर्माची वेगवान सेंचुरी, रोहितचा जलद शतकाचा विक्रम थोडक्यात बचावला