घरक्रीडाप्रो-कबड्डी लिलाव

प्रो-कबड्डी लिलाव

Subscribe

प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमासाठी सोमवारी मुंबईत खेळाडू लिलावाला सुरुवात झाली. मागील मोसमात यु मुम्बा संघाकडून खेळताना दमदार कामगिरी करत सर्वोत्कृष्ट उदयोनमुख खेळाडूचा मान पटकावणार्‍या रेडर सिद्धार्थ देसाईसाठी तेलगू टायटन्स संघाने तब्बल १ कोटी ४५ लाख रुपये मोजून त्याला आपल्या संघाचा भाग बनवले. तोच या लिलावाच्या पहिल्या दिवसाचा सर्वात महागडा खेळाडू होता. लिलाव सुरु होण्याआधी यु मुम्बा त्याला पुन्हा एकदा आपल्या संघात घेईल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही.

सिद्धार्थची मूळ किंमत ३० लाख ठेवण्यात आली होती. मात्र, तेलगू टायटन्सने सर्वांना मागे टाकत सिद्धार्थसाठी थेट १ कोटी रुपयांची बोली लावली. यानंतर तामिळ थलायवाज संघही त्याला आपल्या संघात घेण्यास उत्सुक दिसला. या दोन्ही संघांमध्ये त्याच्यासाठी चांगलाच संघर्ष पहायला मिळाला. अखेर तेलगू टायटन्सने १ कोटी ४५ लाखांच्या बोलीवर सिद्धार्थला आपल्या संघाचा भाग बनवले. यु मुम्बाकडे ‘फायनल बिड टू मॅच’ कार्डाद्वारे सिद्धार्थला आपल्या संघात कायम राखण्याची संधी होती. मात्र, मुम्बाने या कार्डाचा वापर केला नाही. त्यामुळे पुढील मोसमात सिद्धार्थ तेलगू टायटन्सकडून खेळताना दिसेल. मागील मोसमात सिद्धार्थने एकूण २२१ गुण मिळवले होते. यामध्ये २१८ गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले होते.

- Advertisement -

त्याचप्रमाणे मागील वर्षी सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या मोनू गोयतला युपी योद्धा संघाने ९३ लाखांत खरेदी केले. तसेच नितीन तोमरला १.२० कोटी रुपयांत पुणेरी पलटणने, रेडर राहुल चौधरीला ९४ लाखांत तामिल थलायवाझने तर संदीप नरवालला ८९ लाखांत यु मुम्बाने खरेदी केले. महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये ऋतुराज कोरवी, गिरीश ऐरनाक, विशाल माने, श्रीकांत जाधव, रिशांक देवाडिगा या खेळाडूंनाही विविध संघानी खरेदी केले आहे. मुंबईत सोमवारी सुरु झालेला लिलाव मंगळवारीही सुरु राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -