घरक्रीडाआम्हाला तुझी गरज नाही!

आम्हाला तुझी गरज नाही!

Subscribe

एबीच्या निवृत्ती मागे घेण्याच्या प्रस्तावाला द.आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने नाकारले

दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याने यावर्षी इंग्लंडमधील विश्वचषकासाठी निवृत्ती मागे घेत पुन्हा द.आफ्रिकेसाठी खेळण्याची तयारी दर्शवली होती, पण द.आफ्रिकन बोर्ड आणि निवड समितीने त्याला संघात घेण्यास नकार दिला. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात द.आफ्रिकेच्या संघाला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यांनी आतापर्यंत ३ पैकी ३ सामने गमावल्याने त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असल्यास पुढील सर्व सामने जिंकणे जवळपास अनिवार्य आहे. मात्र, विश्वचषकात ६३.५२ च्या सरासरीने १२०७ धावा करणारा डिव्हिलियर्स संघात असता, तर चित्र कदाचित वेगळे असते.

एका क्रिकेट संकेतस्थळाच्या माहितीनुसार डिव्हिलियर्सने एप्रिलमध्ये विश्वचषकासाठी द.आफ्रिकेचा संघ जाहीर होण्याआधी निवृत्ती मागे घेत पुन्हा संघासाठी खेळण्याचा प्रस्ताव द.आफ्रिकेच्या संघ व्यवस्थापनापुढे ठेवला होता. कर्णधार फॅफ डू प्लेसिस आणि प्रशिक्षक ओटीस गिब्सन यांनाही डिव्हिलियर्स विश्वचषकाच्या संघात असावा असे वाटत होते. मात्र, काही कारणांनी त्याला संघात घेण्यास निवड समितीने आणि क्रिकेट बोर्डाने नकार दिला. यातील सर्वात प्रमुख कारण म्हणजे त्याला अचानक संघात घेतल्याने इतर खेळाडूंवर अन्याय झाला असता असे त्यांना वाटले. तसेच २०१८च्या मे महिन्यात म्हणजेच विश्वचषक सुरू होण्याआधी बरोबर एक वर्ष डिव्हिलियर्स निवृत्त झाल्याने तो या काळात स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत खेळला नव्हता, जो द.आफ्रिकेचा या विश्वचषकासाठीच्या संघनिवडीचा निकष होता. याच दोन प्रमुख कारणांनी निवड समितीने विश्वचषकासाठी त्याची संघात निवड करणे टाळले.

- Advertisement -

द.आफ्रिका अजूनही विश्वचषक जिंकू शकतो – एबी

द.आफ्रिकेच्या निवड समितीने एबी डिव्हिलियर्सला विश्वचषकासाठी संघात घेतले नसले, तरी त्याने ट्विटरवरून या संघाला पाठिंबा दर्शवला आहे. सध्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सर्वांनी विश्वचषकात द.आफ्रिकेच्या संघाला पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. या स्पर्धेत अजून बरेच सामने बाकी आहेत आणि आपला (द.आफ्रिकेचा) संघ अजूनही विश्वचषक जिंकू शकतो असा मला विश्वास आहे, असे त्याने या ट्विटमध्ये लिहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -