घरक्रीडाPSL 2021 : मकसूदच्या झंझावाती खेळीमुळे मुल्तान सुल्तान्सला पाकिस्तान सुपर लीगचे जेतेपद

PSL 2021 : मकसूदच्या झंझावाती खेळीमुळे मुल्तान सुल्तान्सला पाकिस्तान सुपर लीगचे जेतेपद

Subscribe

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा जिंकण्याची ही मुल्तान सुल्तान्सची पहिलीच वेळ ठरली.

शोएब मकसूदने केलेल्या झंझावाती खेळीच्या जोरावर मुल्तान सुल्तान्सने अंतिम सामन्यात पेशावर झाल्मीचा ४७ धावांनी पराभव करत पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) स्पर्धेच्या सहाव्या मोसमाचे जेतेपद पटकावले. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा जिंकण्याची ही मुल्तान सुल्तान्सची पहिलीच वेळ ठरली. या सामन्यापूर्वी शोएब मकसूदचे पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले होते. त्याने हा आनंद साजरा करताना पाकिस्तान सुपर लीगच्या अंतिम सामन्यात नाबाद ६५ धावांची खेळी केली. त्याने या धावा ३५ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने केल्या. त्यामुळे त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

मकसूद, रायली रुसोची फटकेबाजी

अबू धाबी येथे झालेल्या या सामन्यात पेशावरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुल्तानने २० षटकांत ४ बाद २०६ अशी धावसंख्या उभारली. मुल्तानचे सलामीवीर शान मसूद (२९ चेंडूत ३७) आणि कर्णधार मोहम्मद रिझवान (३० चेंडूत ३०) यांनी डावाची चांगली सुरुवात केली. या दोघांनाही मोहम्मद इम्रानने बाद केले. यानंतर मकसूद (३५ चेंडूत नाबाद ६५) आणि रायली रुसो (२१ चेंडूत ५०) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे मुल्तानने दोनशे धावांचा टप्पा पार केला.

- Advertisement -

मोठी खेळ करण्यात अपयश

२०७ धावांचा पाठलाग करताना अनुभवी सलामीवीर कमरान अकमलने २८ चेंडूत ३६ धावा करत पेशावरला उत्तम सुरुवात करून दिली. त्यानंतर शोएब मलिक (२८ चेंडूत ४८) आणि रोवमन पॉवेल (१४ चेंडूत २३) यांनी काही काळ चांगली फलंदाजी केली. परंतु, पेशावरचा कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. त्यामुळे पेशावरला २० षटकांत ९ बाद १५९ धावाच करता आल्या आणि मुल्तानने हा सामना ४७ धावांनी जिंकत पाकिस्तान सुपर लीगचे आपले पहिलेवहिले जेतेपद पटकावले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -