CHINA OPEN 2018 : उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांत, सिंधूचा पराभव

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांचा चीन ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला.

श्रीकांत, सिंधूचा पराभव (सौ-Quint)

भारताचे बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांचे चीन ओपनमधील आव्हान संपुष्टात आले आहे. या दोघांचाही स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. सिंधूचा चीनची खेळाडू चेन युफेई हिने पराभव केला. तर जपानच्या केंटो मोमोटाने श्रीकांतचा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

सिंधू युफेईकडून पराभूत 

उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात पी. व्ही. सिंधूचा चीनच्या चेन युफेईने ११-२१, २१-११, १५-२१ असा पराभव केला. या सामन्याची युफेईने चांगली सुरुवात केली. या सामन्यातील पहिल्या सेटच्या मध्यंतरापर्यंत तिच्याकडे ११-५ अशी आघाडी होती. तिने आपले वर्चस्व यापुढेही कायम राखत हा सेट २१-११ असा जिंकला. पण सिंधूने दुसऱ्या सेटमध्ये युफेईला चांगली टक्कर दिली. या सेटच्या मध्यंतरापर्यंत सिंधूकडे ११-८ अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर सिंधूने अप्रतिम खेळ करत युफेईला अवघे ३ गुण मिळवू दिले. त्यामुळे सिंधूने दुसरा सेट २१-११ असा जिकल. त्यामुळे सामना तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये गेला. या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला. त्यामुळे या सेटच्या मध्यंतरापर्यंत युफेईकडे ११-८ अशी अवघ्या ३ गुणांची आघाडी होती. पण मध्यंतरानंतर सिंधूला चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे तिने हा सेट १५-२१ असा गमावला. याचसोबत तिने हा सामनाही गमावला.

मोमोटाने केला श्रीकांतचा पराभव

पुरुष एकेरीत भारताच्या किदाम्बी श्रीकांतचा जपानच्या केंटो मोमोटाने ९-२१, ११-२१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या सामन्याच्या सुरूवातीपासूनच मोमोटाने श्रीकांतवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पहिल्या सेटची सुरूवातच मोमोटाने ५-१ अशा मोठ्या फरकाने केली. यातून श्रीकांत सावरू शकला नाही आणि त्याने पहिला सेट ९-२१ अशा मोठ्या फरकाने गमावला. दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला दोन खेळाडूंत ४-३ असा अवघा एका गुणाचा फरक होता. पण यानंतर मोमोटाने ९ सलग गुण मिळवत १३-३ अशी मोठी आघाडी मिळवली. त्याने आपला अप्रतिम खेळ सुरूच ठेवत हा सेट २१-११ असा जिंकला आणि श्रीकांतला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. याआधी मोमोटाने श्रीकांतचा मलेशिया ओपन आणि इंडोनेशिया ओपनमध्येही पराभव केला होता.