PV. Sindhu : फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचे आव्हान संपुष्टात

भारताची स्टार बॅडमिंटनपटू दोन वेळा ऑलिम्पिक विजेती पी.व्ही. सिंधूचा फ्रेंच खुल्या गटातील अंतिम फेरीत पराभव झाला असून ती अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरली आहे

भारताची स्टार बॅडमिंटनपटू दोन वेळा ऑलिम्पिक विजेती पी.व्ही. सिंधूचा फ्रेंच खुल्या गटातील अंतिम फेरीत पराभव झाला असून ती अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरली आहे. शनिवारी तीन गेमपर्यंत रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या सयाका ताकाशाहीविरूध्द सिंधूचा पराभव झाला. त्यामुळे हंगामातील तिचे आव्हान संपुष्टात आले आहे. हैदराबादच्या २६ वर्षीय पी.व्ही. सिंधूने आपला पहिला गेम २१-१८ अशा फरकाने जिंकून जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर असलेल्या ताकाशाहीला सावधगिरीचा इशारा दिला, पण तो इशारा सामन्यात विजय मिळवण्यात पुरेसा ठरला नाही.

पहिल्या गेममध्ये वर्चस्व गाजवलेल्या पी.व्ही सिंधूला मात्र पुढील २ गेममध्ये १६-२१,१२-२१ अशा मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. २९ वर्षीय ताकाशाहीविरूध्दच्या या आठव्या लढतीत सिंधूला चौथ्या पराभवास सामोरे जावे लागले.

मागील आठवड्यात ओडेन्स येथे झालेल्या डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात विश्वविजेत्या सिंधूला पराभव पत्करावा लागला होता. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर विश्रांती घेतलेल्या पी.व्ही सिंधूची ही पुनरागमनाची दुसरी स्पर्धा होती. त्यात तिला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली. रिओ गेम्समध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर तब्बल ५ वर्षांनंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने कास्य पदाची कमाई केली होती.