घरक्रीडानदालची उपांत्य फेरीत धडक

नदालची उपांत्य फेरीत धडक

Subscribe

अमेरिकन ओपन टेनिस

स्पेनचा महान खेळाडू आणि दुसर्‍या सीडेड राफेल नदालने अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाच्या दिएगो स्वात्झमनचा ६-४, ७-५, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. रॉजर फेडरर आणि गतविजेता नोवाक जोकोविच याआधीच स्पर्धेतून बाहेर झाल्याने नदालला ही स्पर्धा जिंकण्याचे प्रमुख दावेदार मानले जात आहे. नदालने याआधी तीन वेळा अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावले आहे, तर या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची नदालची ही आठवी वेळ आहे.

स्वात्झमन हा अमेरिकन ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा मागील २५ वर्षांतील सर्वात कमी उंचीचा (५ फूट ७ इंच) टेनिसपटू आहे. त्याने या सामन्यात १८ वेळच्या ग्रँड स्लॅम विजेत्या नदालला चांगली झुंज दिली. या सामन्याच्या सुरुवातीला नदालने आक्रमक खेळ केला. त्याने स्वात्झमनच्या पहिल्याच दोन सर्व्हिस मोडत ४-० अशी आघाडी मिळवली. मात्र, स्वात्झमनने दमदार पुनरागमन करत नदालची सर्व्हिस दोनदा मोडत या सेटमध्ये ४-४ अशी बरोबरी केली. परंतु, नदालने यानंतरचे दोन गेम जिंकत पहिला सेट ६-४ असा जिंकला.

- Advertisement -

दुसर्‍या सेटचीही नदालने अप्रतिम सुरुवात करत ५-१ अशी आघाडी मिळवली. मात्र, पहिल्या सेटप्रमाणेच या सेटमध्येही स्वात्झमनने पुनरागमन केले. त्याने सलग ४ गेम जिंकत या सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी केली, पण पुन्हा नदालने योग्य वेळी आपला खेळ उंचावला आणि हा सेट ७-५ असा जिंकला. तिसर्‍या सेटमध्ये २-२ अशी बरोबरी होती. त्यावेळी नदालने आपली सर्व्हिस राखत आणि स्वात्झमनची सर्व्हिस मोडत ४-२ अशी आघाडी मिळवली. यानंतर स्वात्झमनला सामन्यात परतता आले नाही. त्यामुळे नदालने हा सेट ६-२ असा मोठ्या फरकाने जिंकत या स्पर्धेमध्ये आगेकूच केली.३३ वर्षीय नदालचा उपांत्य फेरीत इटलीच्या माटेयो बेरेटीनीशी सामना होईल. बेरेटीनीने उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सच्या गिल मॉनफिल्सला ३-६, ६-३, ६-२, ३-६, ७-६ असे पाच सेटमध्ये पराभूत केले.

बेलिंडा बेंचीचची आगेकूच

स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेंचीचनेअमेरिकन ओपनची उपांत्य फेरी गाठली आहे. ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची ही बेंचीचची पहिलीच वेळ आहे. तिने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाच्या डोना वेकीचवर ७-६, ६-३ अशी सरळ सेटमध्ये मात केली. तिचा उपांत्य फेरीत कॅनडाच्या बियांका आंद्रेस्कुशी सामना होईल. आंद्रेस्कुने २५ व्या सीडेड एलिस मर्टेन्सचा ३-६, ६-२, ६-३ असा पराभव केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -