Ind vs SL: कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा कसून सराव, खेळाडूंचा द्रविडसोबतचा फोटो व्हायरल

टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. दुसरा सामना १२ मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी एक डाव आणि २२२ धावांनी जिंकली. मंगळवारी जिम सेशननंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपलं जिममधील वर्कआऊट केल्यानंतर खेळाडूंना फोटोसाठी पोझ दिली. राहुल द्रविड, रविचंद्रन अश्विन, कर्णधार रोहित शर्मा, जयंत यादव आणि ऋषभ पंत या फोटोत दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashwin (@rashwin99)

अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हा फोटो शेअर केला आहे. अश्विनने त्याला कॅप्शनही दिले आहे. दुसरीकडे, माजी भारतीय खेळाडू रतिंदर सोधी म्हणाले की, शर्मा हा नैसर्गिक कर्णधार आहे आणि त्याने भारतीय कर्णधार म्हणून आपल्या अल्प कालावधीत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय कर्णधाराने प्लेइंग इलेव्हन निवडल्याचे सोधी यांनी अधोरेखित केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सोधी यांनी मोहाली कसोटीत रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा आढावा घेताना सांगितले की, तुम्हाला रोहित शर्माची खूप प्रशंसा करावी लागेल. त्याने उत्तम प्रकारे कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. हा त्याचा पहिला कसोटी सामना होता. अशा परिस्थितीत चिंताग्रस्त होणे स्वाभाविक आहे, परंतु रोहित शर्मामध्ये हे दिसले नाही. मला वाटते की, तो कर्णधारपदासाठी व्यवस्थित तयार झाला आहे.

बंगळुरू येथे होणारा दुसरा कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाणार आहे. भारताने गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा डे-नाईट कसोटी सामना खेळला होता. टीम इंडियाला तो सामना दहा गडी राखून जिंकण्यात यश आले. भारतीय संघाने आतापर्यंत तीन दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये दोन सामने जिंकले आहेत.


हेही वाचा : सरकारी वकिलामार्फत भाजपला संपविण्याचे षड्यंत्र