घरक्रीडामुंबई शहर, ठाण्याची उपांत्य फेरीत धडक

मुंबई शहर, ठाण्याची उपांत्य फेरीत धडक

Subscribe

राजाभाऊ देसाई चषक कबड्डी

मुंबई शहर, ठाणे यांसारख्या संघांनी स्वामी समर्थ क्रीडा मंडळ आयोजित राजाभाऊ चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्याचप्रमाणे राज्य अजिंक्यपद स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या रत्नागिरीलाही या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यात यश आले. आता अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी रत्नागिरीची झुंज रायगडशी, तर मुंबई शहरची झुंज ठाण्याशी होईल.

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीतील जनार्दन राणे क्रीडानगरीत होत असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत ठाण्याने मुंबई उपनगरवर ४२-३२ असा विजय मिळवला. या सामन्यात सोनू थळे आणि सूरज दुदले यांनी वेगवान सुरुवात करत ठाण्याला १९-१२ अशी आघाडी मिळवून दिली. पुढे ठाण्याने अधिकच आक्रमक खेळ करत ३३-२२ अशी आघाडी घेतली. यानंतर उपनगरच्या संघाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. या सामन्यात ठाण्याकडून सूरज दुदलेने ८, तर उमेश म्हात्रेने ७ गुण चढाईचे टिपले.

- Advertisement -

रत्नागिरीने सांगलीचा ३९-२३ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. चढाईत रोहन गमरे आणि पकडीत शुभम शिंदेने केलेल्या अप्रतिम खेळामुळे मध्यंतराला रत्नागिरीकडे २७-११ अशी भक्कम आघाडी होती. त्यानंतरही त्यांनी दमदार खेळ सुरु ठेवत हा सामना १६ गुणांच्या फरकाने जिंकला. तर मुंबई शहरने पालघरला ४५-२९ असे सहज नमवून स्पर्धेत आगेकूच केली. मुंबई शहरच्या या विजयात सुशांत साईल आणि ओंकार जाधव हे खेळाडू चमकले. चढाईत सुशांतने १३ गुण आणि ओंकारने १० गुण मिळवले.

रायगडची आगेकूच!

रायगडच्या संघानेही राजाभाऊ देसाई चषक कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्यांनी कोल्हापूरचा ४१-१२ असा धुव्वा उडवला. आपल्या दोन्ही साखळी लढती जिंकलेल्या रायगडने पूर्वार्धातच कोल्हापूरवर तीन लोण दिले. त्यामुळे मध्यंतराला त्यांच्याकडे ३०-७ अशी मोठी आघाडी होती. उत्तरार्धात दोन्ही संघांना फारसे गुण मिळवता आले नाहीत. त्यामुळे रायगडने हा सामना तब्बल २९ गुणांच्या फरकाने जिंकला. त्यांच्या विजयात अमीर धुमाळ आणि स्मितील पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -