घरक्रीडादोन विजयांसह मुंबई उपनगरचा बाद फेरीत प्रवेश

दोन विजयांसह मुंबई उपनगरचा बाद फेरीत प्रवेश

Subscribe

राजाभाऊ देसाई चषक कबड्डी

सौरभ पार्टे आणि सुमेध सावंतच्या दमदार खेळाच्या जोरावर मुंबई उपनगरने स्वामी समर्थ क्रीडा मंडळ आयोजित राजाभाऊ चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत दोन विजयांची नोंद करत बाद फेरीत प्रवेश केला. यजमान मुंबई शहर, ठाणे, सांगली आणि रायगड यांनी या स्पर्धेत विजयी सलामी दिली. ड गटातून मुंबई उपनगर आणि सांगली हे संघ बाद फेरीत पोहोचले, तर दोन्ही साखळी सामने गमावणारा नाशिकचा संघ पहिल्याच दिवशी स्पर्धेबाहेर झाला.

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीतील जनार्दन राणे क्रीडानगरीत होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनीय सामन्यात ठाण्याने नंदुरबारला २७-२६ असे अवघ्या एका गुणाने पराभूत केले. या सामन्याच्या मध्यंतराला नंदुरबारकडे १३-१२ अशी एका गुणाची आघाडी होती. मात्र, उत्तरार्धात ठाण्याने आपला खेळ उंचावत हा सामना जिंकला. ठाण्याच्या विजयात सुरज दुंदलेने महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच रायगडने पुण्याचा ४०-३३ असा पराभव केला. रायगडच्या या विजयात स्मितील पाटील आणि गौरव पाटील हे खेळाडू चमकले.

- Advertisement -

दुसरीकडे मुंबई उपनगरने सर्वप्रथम बाद फेरीत प्रवेश केला. त्यांनी पहिल्या सामन्यात नाशिकवर ४७-२५ अशी, तर दुसर्‍या सामन्यात सांगलीवर २९-२१ अशी मात केली. त्यांच्याकडून सौरभ पार्टे आणि सुमेध सावंत या चढाईपटूंनी अप्रतिम खेळ केला. उपांत्यपूर्व फेरीत मुंबई उपनगरचा सामना राज्य कबड्डी विजेत्या रत्नागिरी किंवा ठाण्याशी होऊ शकेल. सांगलीने नाशिकला पराभूत करत स्पर्धेत आगेकूच केली.

मुंबई शहरची विजयी सलामी
मुंबई शहरने आपल्या पहिल्या सामन्यात अहमदनगरचा ५३-३५ असा धुव्वा उडवला. त्यांनी या सामन्यात ४ लोण दिले. कर्णधार अजिंक्य कापरे, सुशांत साईल, मयूर शिवतरकर यांच्या दमदार खेळामुळे मध्यंतराला मुंबई शहरकडे ३४-१२ अशी भक्कम आघाडी होती. उत्तरार्धात त्यांनी चांगला खेळ सुरू ठेवत हा सामना जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -