रहाणे, पृथ्वी शॉची अर्धशतके

बडोदाविरुद्ध पहिल्या दिवसअखेर मुंबई ८ बाद ३६२,रणजी करंडक

Ajinkya Rahane

अनुभवी अजिंक्य रहाणे आणि सलामीवीर पृथ्वी शॉ यांनी केलेल्या अर्धशतकांमुळे रणजी करंडकातील बडोद्याविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात मुंबईने पहिल्या दिवसअखेर ८ बाद ३६२ अशी धावसंख्या उभारली. चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या फळीच्या खराब कामगिरीमुळे मुंबईचा डाव गडगडला. मात्र, भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असणार्‍या रहाणेने संयमाने फलंदाजी करत १४५ चेंडूत ७९ धावांची खेळी करत मुंबईचा डाव सावरला.

या सामन्यात मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर पृथ्वीवर डोपिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर हा त्याचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलाच सामना होता. त्याने पुन्हा एकदा आपली चमक दाखवत अवघ्या ६२ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकारासह ६६ धावा केल्या. तसेच त्याने आणि जय बिस्ता (१८) यांनी ७४ धावांची सलामी दिली.

तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शुभम रांजणेने ३६ धावा केल्यावर त्याला डावखुरा फिरकीपटू भार्गव भट्टने माघारी पाठवले. सूर्यकुमार (०), आदित्य तरे (१२) आणि आकाश पारकर (१५) झटपट बाद झाल्याने मुंबईची २ बाद १५२ वरुन ५ बाद १८२ अशी अवस्था झाली. मात्र, यानंतर रहाणे (७९), शम्स मुलानी (५६) आणि शार्दूल ठाकूर (६४) यांनी मुंबईचा डाव सावरला. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर मुंबईची ९० षटकांत ८ बाद ३६२ अशी धावसंख्या होती.

संक्षिप्त धावफलक – मुंबई : पहिला डाव – ९० षटकांत ८ बाद ३६२ (रहाणे ७९, पृथ्वी ६६, शार्दूल ६४, मुलानी नाबाद ५६; भार्गव भट्ट ३/११०).