घरक्रीडाउपहाराआधीच मुंबईचा ११४ धावांत खुर्दा

उपहाराआधीच मुंबईचा ११४ धावांत खुर्दा

Subscribe

प्रदीपचे ६ बळी, रेल्वे ५ बाद ११६,रणजी करंडक

टी. प्रदीप, अमित मिश्रा आणि हिमांशू सांगवान या रेल्वेच्या तेज त्रिकुटाने भेदक गोलंदाजी करत रणजी करंडकाच्या लढतीत मुंबईला उपहाराआधीच ११४ धावांत गुंडाळले. याचे उत्तर देताना पहिल्या दिवसअखेर रेल्वेने ५ बाद ११६ अशी मजल मारली. अंधुक प्रकाशामुळे पंचांनी तासभर आधीच खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. अरिंदम घोष (७५ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद ५२) आणि कर्णधार करण शर्मा (४६ चेंडूत ३ चौकारांसह नाबाद २४) या सहाव्या जोडीने ९९ चेंडूत ७३ धावांची अभेद्य भागीदारी करत रेल्वेला पहिल्या डावात २ धावांची आघाडी मिळवून दिली.

वानखेडेच्या हिरव्यागार खेळपट्टीवर नाणेफेकीचा कौल रेल्वेचा कर्णधार करण शर्माच्या बाजूने लागल्यावर त्याने कुंद वातावरणात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. बडोद्याविरुद्ध फटकेबाज द्विशतक तडकवणार्‍या सलामीवीर पृथ्वी शॉला अमित मिश्राने प्रथम सिंगकरवी झेलबाद केले. फटकेबाजीच्या नादात पृथ्वीने (१२) आपली विकेट फेकली. कसोटीपटू अजिंक्य रहाणेला प्रदीपने माघारी पाठवले. अर्ध्या तासात १८ चेंडूंचा सामना करणार्‍या रहाणेला केवळ ५ धावा करता आल्या. प्रदीपनेच जय बिस्ताला (२१) यष्टीरक्षक भिल्लेकरवी झेलबाद केले.

- Advertisement -

कर्णधार सूर्यकुमार यादवने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने गोलंदाजांवर प्रतिहल्ला करत ४० चेंडूत ५ चौकारांसह ३९ धावा केल्यावर त्याला उंचपुर्‍या प्रदीपने बाद केले. कर्णधार माघारी परतल्यानंतर मुंबईची पडझड झाली. त्यांचा पहिला डाव २८.३ षटकांत ११४ धावांत आटोपला. प्रदीपने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत प्रथमच प्रतिस्पर्ध्यांच्या निम्मा संघ गारद करण्याची किमया केली. ३७ धावांत ६ बळी टिपणार्‍या प्रदीपला अमित मिश्रा (३ बळी) आणि सांगवान (१ बळी) यांनी उत्तम साथ दिली.

रणजी करंडकात पदार्पण करणारा मुंबईचा वेगवान गोलंदाज दीपक शेट्टीने रेल्वेला सुरुवातीलाच हादरवले. प्रथम सिंग (९), मृणाल देवधर (१२) आणि नवनीत विर्क (०) यांना त्याने झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यामुळे रेल्वेची ४ बाद २३ अशी अवस्था झाली. उंचापुरा, युवा दीपक जोशपूर्ण मारा करत होता. पुढे आकाश पारकरने दिनेश मोरला (९) शार्दूल ठाकूरकरवी झेलबाद केले, तेव्हा रेल्वेचा निम्मा संघ ४३ धावांत गारद झाला होता. चहापानाला रेल्वेची २६ षटकांत ५ बाद ६६ अशी अवस्था होती.

- Advertisement -

चहापानानंतर मुंबईची सामन्यावरील पकड निसटली ती सूर्यकुमार यादवच्या अनाकलनीय डावपेचांमुळे. सूर गवसलेल्या करणार्‍या दीपक शेट्टीऐवजी कर्णधार सूर्यकुमारने शम्स मुलानी आणि दुसर्‍या एंडकडून आकाश पारकरला गोलंदाजी सोपवली. ही बाब अरिंदम घोष आणि कर्णधार करणच्या पथ्यावर पडली. या सहाव्या जोडीने चौकारांची बरसात करत रेल्वेचे शतक ३५ व्या षटकात फलकावर लावले. अनुभवी घोषने ९ चौकारांसह अर्धशतक साजरे केले. करणने त्याला तोलामोलाची साथ देत रेल्वेला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली.

संक्षिप्त धावफलक –

मुंबई : पहिला डाव – सर्वबाद ११४ (सूर्यकुमार ३९, बिस्ता २१; प्रदीप ६/३७, मिश्रा ३/४१) वि. रेल्वे : पहिला डाव – ३७ षटकांत ५ बाद ११६ (गोष नाबाद ५२, करण नाबाद २४; शेट्टी ३/२०).

४२ वर्षांपूर्वीची मुंबईची घसरगुंडी!

मुंबईने आतापर्यंत तब्बल ४१ वेळा रणजी करंडकाचे जेतेपद पटकावले आहे. मात्र, अलीकडे मुंबई संघाची खडूस वृत्ती लोप पावत चालली आहे. याचेच विदारक चित्र बुधवारी वानखेडे स्टेडियमवर दिसले. रेल्वेने मुंबईला पहिल्या सत्रातच (उपहाराआधी) गुंडाळले. एका सत्रातच डाव कोसळण्याची आपत्ती, तीदेखील सामन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईवर क्वचितच ओढवली आहे. याआधी १९७७ च्या मोसमात गुजरातने मुंबईचा ४२ धावांतच खुर्दा उडवला होता. फिरकीपटू अशोक जोशीने ८ धावांतच ६ मोहरे टिपल्यामुळे मिलिंद रेगेच्या मुंबई संघावर मोठ्या पराभवाची नामुष्की ओढवली. परिणामी मुंबई साखळीतच गारद झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -