घरक्रीडारणजी करंडकावर पहिल्यांदा सौराष्ट्रचे नाव!

रणजी करंडकावर पहिल्यांदा सौराष्ट्रचे नाव!

Subscribe

पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर बंगालवर मात

सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटसाठी यंदाचा रणजी मोसम अविस्मरणीय ठरला. त्याच्या नेतृत्वात सौराष्ट्रने सलग दुसर्‍यांदा रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली, तर गोलंदाजीत उपांत्य फेरीअखेरीस त्याने तब्बल ६५ गडी बाद केले होते. मात्र, बंगालविरुद्ध अंतिम सामन्याच्या पहिल्या चार दिवसांत त्याला आपली छाप पाडण्यात अपयश आले. चौथ्या दिवसअखेरीस त्याच्या खात्यात एकही विकेट नव्हती. परंतु, पाचव्या दिवशी त्याने उत्कृष्ट स्पेल टाकत आपल्या संघाला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. याच आघाडीच्या जोरावर सौराष्ट्रने पहिल्यांदा रणजी करंडकाचे जेतेपद पटकावले.

राजकोटला झालेल्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रच्या ४२५ धावांचे उत्तर देताना बंगालची चौथ्या दिवसअखेर ६ बाद ३५४ अशी धावसंख्या होती. त्यामुळे पहिल्या डावातील आघाडीसाठी पाचव्या दिवशी बंगालला ७१ धावांची, तर सौराष्ट्रला ४ विकेटची आवश्यकता आहे. परंतु, फॉर्मात असलेला अनुस्तुप मुजुमदार (नाबाद ५८) आणि अर्णब नंदी (नाबाद २८) हे फलंदाज खेळपट्टीवर असल्याने बंगाल पहिल्या डावात आघाडी मिळवत हा सामना जिंकेल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, उनाडकटने पुन्हा एकदा आपला खेळ उंचावत सामन्याचे पारडे आपल्या संघाच्या बाजूने झुकवले.

- Advertisement -

उनाडकटने पाचव्या दिवसाच्या सहाव्याच षटकात मुजुमदारला ६३ धावांवर पायचीत पकडले. दोन चेंडूनंतर त्यानेच आकाश दीपला धावचीत करत बंगालला आणखी एक झटका दिला. आकाशला खातेही उघडता आले नाही. यानंतर डावखुरा फिरकीपटू धर्मेंद्रसिंह जाडेजाने मुकेश कुमारला ५ धावांवर बाद केले, तर उनाडकटने ईशान पोरेलला पायचीत पकडत बंगालचा डाव ३८१ धावांवर संपवला. नंदी ४० धावांवर नाबाद राहिला, पण त्याला इतरांची साथ लाभली नाही. त्यामुळे सौराष्ट्रला पहिल्या डावात ४४ धावांची आघाडी मिळाली. यानंतर बंगालला सामना जिंकणे अशक्यच होते. सौराष्ट्रच्या फलंदाजांनी दुसर्‍या डावात संयमाने फलंदाजी केली. त्यामुळे सामन्याअखेरीस सौराष्ट्रची दुसर्‍या डावात ४ बाद १०५ अशी धावसंख्या होती.

संक्षिप्त धावफलक – सौराष्ट्र : ४२५ आणि ४ बाद १०५ (अवि बारोट ३९; शाहबाझ अहमद २/३२) वि. बंगाल : पहिला डाव सर्वबाद ३८१ (सुदीप चॅटर्जी ८१, वृद्धिमान साहा ६४, अनुस्तुप मुजुमदार ६३; धर्मेंद्रसिंह जाडेजा ३/११४, प्रेरक मंकड २/४५, जयदेव उनाडकट २/९६).

- Advertisement -

उनाडकटला विक्रमाची हुलकावणी

सौराष्ट्रचा कर्णधार आणि डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने यंदाच्या रणजी मोसमात १० सामन्यांच्या १६ डावांमध्ये सर्वाधिक ६७ गडी बाद केले. परंतु, रणजीच्या एका मोसमात सार्वधिक विकेटचा विक्रम मोडण्यात त्याला अपयश आले. बिहारचा डावखुरा फिरकीपटू आशुतोष अमनने मागील मोसमात ६८ गडी बाद केले होते. त्याचा हा विक्रम मोडण्यासाठी उनाडकटला बंगालविरुद्धच्या अंतिम सामन्यात ४ विकेटची आवश्यकता होती, पण त्याला २ विकेटच घेता आल्या. त्यामुळे त्याला विक्रमाने हुलकावणी दिली. उनाडकटने यंदाच्या मोसमात ७ वेळा एका डावात पाच, तर ३ वेळा एका सामन्यात दहा विकेट घेतल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -