मुंबई : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील शरद पवार पवार क्रिकेट अकॅडमीच्या ग्राऊंडवर आज गुरुवारी (ता. 23 जानेवारी) जम्मू-काश्मीर आणि मुंबई या संघात रणजी ट्रॉफीसाठीचा सामना खेळवण्यात आला. पण आजच्या या सामन्यात काश्मीरच्या संघाने मुंबईच्या सर्व खेळाडूंना तंबूत पाठवत त्यांची दांडीगुल केल्याचे पाहायला मिळाले. परंतु, टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या शार्दुल ठाकूरने या रणजी ट्रॉफीत मुंबईच्या संघाची लाज राखल्याचे पाहायला मिळाले. कारण शार्दुलने केलेल्या अर्धशतकामुळे मुंबईला किमान 120 धावा तरी करता आल्या आहेत. जर शार्दुलने ही खेळी खेळली नसती तर मुंबईची अवस्था आणखी वाईट झाली असती. (Ranji Trophy Mumbai team all out for 120 runs in first innings against Jammu Kashmir)
रणजी ट्रॉफीच्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु या मुंबईचे स्टार फलंदाज जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांसमोर काही खास करू शकले नाहीत आणि संपूर्ण संघ 120 धावांवर गारद झाला. जम्मू-काश्मीरचे दोन गोलंदाज उमर नझीर आणि युद्धवीर सिंग यांच्याच उत्कृष्ट कामगिरीमुळे मुंबईला 120 इतकीच धावसंख्या करता आली. परंतु, यावेळी पहिल्या डावात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने शानदार फलंदाजी केली. त्याने 57 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या आणि तो या संघाचा सर्वोत्तम धावा करणारा फलंदाजही ठरला. याशिवाय, तनुष कोटियनने शेवटच्या क्षणी 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि त्याच्या फलंदाजीमुळे मुंबईची धावसंख्या 120 धावांपर्यंत पोहोचली. या सामन्यात रोहित शर्मा 3 धाव तर यशस्वी जैस्वाल 4 धावा करून बाद झाले.
हेही वाचा… U19 T20I World Cup : टीम इंडियाच्या पोरींची कमाल, केली ही कामगिरी
याशिवाय, मुंबईजकडून हार्दिक तामोरे याने तिसऱ्या क्रमांकावर येत फलंदाजी केली. पण त्यालाही फारशा धावा करता आलेल्या नाहीत. त्याने केवळ 07 तर त्याच्यामागून आलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणे याने 12 धावा केल्या. भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरही 11 धावांवर बाद झाला. तर, पहिल्या डावात शिवम दुबे आपले खातेही उघडू शकला नाही. शम्स मुलानी आणि मोहित अवस्थी देखील शून्यावर बाद झाले. त्यामुळे मुंबईच्या संघाची गाडी 120 धावांवरच जाऊन थांबली. यानंतर जम्मू-काश्मीरच्या संघाचे पहिल्या डावात 174 धावा झाल्या असून त्यांचे 07 खेळाडू तंबूत परतले आहेत.
मुंबईविरुद्धच्या पहिल्या डावात जम्मू आणि काश्मीरचा 6 फूट 4 इंचाचा वेगवान गोलंदाज उमर नझीरने 11 षटकांत 41 धावा देत 4 खेळाडूंची शिकार केली. तर युद्धवीर सिंगने 8.2 षटकांत 31 धावा देत 4 विकेट घेतल्या. पहिल्या डावात आकिब नाबिदारला 2 यश मिळाले. उमर नझीरने रोहित, हार्दिक, रहाणे आणि शिवम यांचे बळी घेतले तर युद्धवीरने श्रेयस, शम्स मुलानी, शार्दुल आणि मोहित अवस्थीला आऊट केले. पहिल्या डावात आकिबने यशस्वी जैस्वाल आणि तनुश कोटियन यांना बाद केले.