मुंबई : यंदाच्या वर्षी झालेल्या रणजी ट्रॉफीची चांगलीच चर्चा झाली. अनेक दिग्गज खेळाडू यावेळी रणजीमध्ये दिसून आले. विशेष म्हणजे गतविजेता मुंबई संघ यावर्षीही बाजी मारणार अशी अपेक्षा होती. पण, उपांत्य फेरीत मुंबई संघाचा पराभव झाला आणि हा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. विदर्भाने मुंबईचा 80 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली असून विदर्भाच्या संघाने गेल्या वर्षी झालेल्या पराभवाचा वचपा काढला. मुंबईतील संघामध्ये सर्व स्टार खेळाडू असतानाही त्यांना पराभव पत्करावा लागल्याने टीका करण्यात येत आहे. दरम्यान, रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना हा विदर्भ आणि केरळ यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. 26 फेब्रुवारी ते 2 मार्च हा सामना खेळवला जाणार आहे. (Ranji Trophy Semi Final Mumbai lost to vidarbha)
हेही वाचा : IND VS PAK : कोणता संघ जिंकणार? आयआयटी बाबाच्या भविष्यवाणीमुळे चाहत्यांचा संताप
विदर्भाने पहिल्या डावात 383 आणि दुसऱ्या डावात 292 धावा केल्या. तसेच 383 धावांचा सामना करण्यास उतरलेल्या मुंबई संघाचा पहिला डाव 270 धावांवर आटोपला. मुंबईला 406 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते, पण त्यांना 325 धावांतमध्ये चीतपट केले. तसेच विदर्भाने 80 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबेदेखील अवघ्या प्रत्येकी 12 धावा करत बाद झाले. तर सूर्यकुमार यादवनेही 20 चेंडूत फक्त 23 धावा केल्या. विदर्भने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संघाने मोठी धावसंख्या उभारत हा निर्णय अगदी योग्य ठरवला. मुंबईकडून शिवम दुबेने पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या. तर रॉयस्टन डायस आणि शम्स मुलानी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले.
विदर्भच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात मुंबईचा संघ आकाश आनंदच्या शतकाच्या जोरावर २७० धावा करत सर्वबाद झाला. आकाश आनंदनंतर सिद्धेश लाडने 35 धावा, शार्दुल ठाकूरने 37 धावा आणि तनुष कोटियनने 33 धावा केल्या. पार्थ रेखाडेने अजिंक्य रहाणेला 18 धावांवर तर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेला शून्यावर बाद केले. यश राठोड 151 धावा आणि कर्णधार अक्षय वाडकरच्या 52 धावांच्या जोरावर विदर्भने 400 अधिक धावांची आघाडी मिळवली. दरम्यान, केरळ आणि गुजरातमध्ये झालेल्या सामन्यात केरळने विजय मिळवला. पहिल्या डावात केरळच्या 457 धावांच्या प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 455 धावांवर सर्वबाद झाला. पहिल्या डावात 2 धावांच्या आघाडीच्या आधारे, केरळने सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्यांचा सामना विदर्भाशी होईल. सलामीवीर प्रियांक पांचाळने 148 धावांची शानदार खेळी केली, पण संघातील इतर खेळाडूंकडून त्याला फारशी साथ मिळाली नाही. सिद्धार्थ देसाईने 30 धावांचे योगदान दिले.