मुंबई : अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशीद खान याने मंगळवारी टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. राशीद खान हा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. राशीदने वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ड्वेन ब्राव्हो याचा विक्रम मोडीत काढला आहे. रशीदने एमआय केपटाऊन आणि पार्ल रॉयल्स यांच्यातील एसएस२० च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये ही कामगिरी केली. रशीद खानच्या नेतृत्वाखालील एमआय केपटाऊनने चालू हंगामात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. (Rashid Khan become highest wicket taker in T20 cricket surpasses Dwayne Bravo world record)
पहिल्या क्वालिफायरमध्ये त्याच्या संघ एमआय केपटाऊनने पार्ल रॉयल्सचा 39 धावांनी पराभव केला. या सामन्यात अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशीद खानने 33 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. रशीद खानच्या नावावर 161 टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. तसेच, राशीदने देशांतर्गत आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये 472 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, आतापर्यंत राशीद खान सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, अॅडलेड स्ट्रायकर्स, ससेक्स शार्क्स आणि ट्रेंट रॉकेट्सकडून फ्रँचायझी क्रिकेट खेळला आहे.
रशीद खानने त्याच्या 461 व्या सामन्यात ही कामगिरी केली, तर ड्वेन ब्राव्होने 582 सामन्यात 631 विकेट्स घेतल्या. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा सुनील नरीन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 574 विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या दोन हंगामातील खराब कामगिरी आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर, एमआय केपटाऊन नऊ सामन्यांमध्ये सहा विजय नोंदवून SA20 च्या तिसऱ्या हंगामात 30 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
रशीदच्या नेतृत्वाखाली, अफगाणिस्तान संघाने गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकात सुपर एट टप्प्यात ऑस्ट्रेलियाला हरवून आणि नंतर अंतिम चारमध्ये पोहोचून सर्वांना आश्चर्यचकित केले.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स
- 632 – रशीद खान
- 631 – ड्वेन ब्राव्हो
- 574 – सुनील नरेन
- 531 – इम्रान ताहिर
- 492 – शकिब अल हसन
- 466 – आंद्रे रसेल
हेही वाचा – Team India : भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफला पोलिसांनी चाहता म्हणून अडवलं अन्…; पाहा काय घडलं?