Homeक्रीडाRohit Sharma : रोहित शर्मा कसोटीतून निवृत्त झाल्यास...; रवी शास्त्रींचे सूचक वक्तव्य

Rohit Sharma : रोहित शर्मा कसोटीतून निवृत्त झाल्यास…; रवी शास्त्रींचे सूचक वक्तव्य

Subscribe

खराब फॉर्मचा सामना करत असलेला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारू शकतो, असे अंदाज बांधले जात आहेत. याचपार्श्वभूमीवर आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

नवी दिल्ली : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलिया संघ 2-1 ने आघाडीवर आहे. या मालिकेतील शेवटचा सामना शुक्रवारपासून (3 जानेवारी) सिडनी येथे खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्याआधीच खराब फॉर्मचा सामना करत असलेला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारू शकतो, असे अंदाज बांधले जात आहेत. भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही शेवटच्या कसोटीत रोहित शर्माच्या खेळण्यावर संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. याचपार्श्वभूमीवर आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूचक वक्तव्य केले आहे. (Ravi Shastri suggestive statement on Rohit Sharma Test retirement)

गौतम गंभीर याने सिडनी कसोटीपूर्वी रोहित शर्मा शेवटच्या कसोटीसाठी प्लेइंग-11 चा भाग असेल की नाही हे सांगण्यास नकार दिला आहे. तसेच सामन्यापूर्वी खेळपट्टी पाहूनच प्लेइंग-11 बाबत निर्णय घेतला जाईल, असे गंभीर म्हणाला आहे. त्यामुळे खराब फॉर्मशी झुंजत असलेला रोहित शर्मा पाचव्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही, अशी चर्चा आता रंगली आहे. याप्रकरणी आता रवी शास्त्री यांनी आयसीसी रिव्ह्यू कार्यक्रमात रोहित शर्माच्या निवृत्तीवर भाष्य केले आहे.

रवी शास्त्री म्हणाले की, जर मी रोहितच्या जवळ कुठेही असतो तर मी त्याला सांगितले असते की, सामन्यात मोठे फटके मार आणि खेळाचा आनंद लूट. कारण सध्या रोहित शर्मा ज्या पद्धतीने खेळत आहे, हे चांगले नाही. रोहितला विरोधी गोलंदाजाविरुद्ध आक्रमक खेळायची गरज आहे. जर असे झाले तर त्याची कामगिरी सुधारू शकते. यानंतर रोहित शर्मा त्याच्या कारकिर्दीबाबत निर्णय घेऊ शकतो. पण सध्या तो तरुण नाही, त्यामुळे रोहित शर्माने निवृत्तीचा निर्णय घेतल्यास मला आश्चर्य वाटणार नाही, असे वक्तव्य शास्त्री यांनी केले.

हेही वाचा – Arjuna Award : महाराष्ट्राच्या सचिन खिलारी, स्वप्नील कुसळेला अर्जुन पुरस्कार जाहीर; ही आहेत विजेत्यांची नावे

रवी शास्त्री म्हणाले की, अनेक युवा खेळाडू रांगेत उभे आहेत. शुभमन गिलची 2024 मध्ये सरासरी 40 आहे. अशा खेळाडूला बाकावर बसलेले पाहून आश्चर्य वाटते. त्यामुळे रोहित शर्माने निवृत्तीचा निर्णय घेतल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. पण हा निर्णय पूर्णपणे रोहितचा असेल. कारण भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास परिस्थिती वेगळी असेल. त्यामुळे रोहित शर्माकडे आपला क्रिकेटमधील प्रवास संपवण्याची हीच योग्य वेळ आहे, असे म्हणत रवी शास्त्री यांनी रोहित शर्माने निवृत्ती घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

रोहित खराब फॉर्मशी झुंजतोय

दरम्यान, ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत रोहित शर्माचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. तसेच मागील तीन मालिकांमध्ये रोहित शर्माने 15 डावात 10.93 च्या सरासरीने केवळ 164 धावा केल्या आहेत. तीन मालिकांपैकी दोन मालिका देशांतर्गत खेळवल्या गेल्या होत्या. ज्यात रोहित शर्माने केवळ एक अर्धशतक झळकावले. धक्कादायक म्हणजे सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहितला केवळ 31 धावा करता आल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या सामन्यात संधी मिळाल्यास रोहित शर्मा किती धावा करतो? तसेच तो निवृत्तीची घोषणा करतो का? हे  देखील पाहावे लागेल.

हेही वाचा – Khel Ratna Award : डी गुकेश, मनू भाकरला खेलरत्न जाहीर; 17 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव