Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs ENG : अश्विन ४०० पार; 'ही' कामगिरी करणारा केवळ चौथा...

IND vs ENG : अश्विन ४०० पार; ‘ही’ कामगिरी करणारा केवळ चौथा भारतीय

भारताकडून सर्वात जलद ४०० कसोटी बळींचा विक्रम आता अश्विनच्या नावे झाला आहे.

Related Story

- Advertisement -

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना सध्या अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यात फिरकीपटूंचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन या भारताच्या फिरकीपटूंनी दोन्ही डावांमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. अश्विनसाठी हा सामना खास ठरला. त्याने या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जोफ्रा आर्चरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यासह अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० विकेटचा टप्पा गाठला. या कसोटीआधी अश्विनच्या ३९४ विकेट होत्या. त्याने या कसोटीच्या पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावात तीन विकेट घेत कसोटीत ४०० बळी पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो भारताचा चौथा गोलंदाज आहे.

भारताकडून सर्वात जलद ४०० बळी

२०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा अश्विन सध्या त्याच्या ७७ व्या कसोटी सामन्यात खेळत असून त्याने आता ४०० विकेटचा टप्पा गाठला. त्यामुळे भारताकडून सर्वात जलद ४०० कसोटी बळींचा विक्रम आता अश्विनच्या नावे झाला आहे. याआधी हा विक्रम महान लेगस्पिनर अनिल कुंबळेच्या नावे होता. त्याने ८५ कसोटी सामन्यांत ४०० विकेट घेतल्या होत्या.

मुरलीधरनचा विक्रम कायम

- Advertisement -

जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जलद अजूनही श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने ही कामगिरी केवळ ७२ कसोटीत केली होती. भारताकडून कसोटीत ४०० विकेट घेणारा अश्विन हा चौथा गोलंदाज असून याआधी कुंबळे (६१९), कपिल देव (४३४) आणि हरभजन सिंग (४१७) यांनी ही कामगिरी केली होती.

- Advertisement -