IND vs ENG : इंग्लंड कसोटी मालिकेत ‘या’ भारतीय खेळाडूची भूमिका महत्वाची!

इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पनेसारने हे मत व्यक्त केले.

pujara, ashwin, kohli
चेतेश्वर पुजारा, अश्विन, विराट कोहली 

इंग्लंड क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याला लवकरच सुरुवात होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका होणार असून या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक कामगिरी केली होती. भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, या मालिकेत कोणता संघ विजेता ठरणार, हे भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या कामगिरीवर अवलंबून असेल, असे मत इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पनेसारने व्यक्त केले.

आत्मविश्वास वाढला असेल 

अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असेल. आता तो इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असेल. इंग्लंडचे फलंदाज अश्विनविरुद्ध कसे खेळतात, यावर या मालिकेचा निकाल अवलंबून असेल. तो गोलंदाज म्हणून आता अधिक चतुर झाला असून सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेत अश्विनची भूमिका महत्वाची असणार आहे, असे पनेसारने सांगितले.

इतरांची साथ मिळणे गरजेचे 

अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटीत १२ विकेट घेतल्या होत्या. तसेच इंग्लंडविरुद्ध भारतात त्याच्या नावे ९ कसोटीत ४२ विकेट आहेत. मात्र, अश्विनला इतर फिरकीपटूंची साथ मिळणेही गरजेचे आहे, असे पनेसारला वाटते. इंग्लंडच्या फलंदाजांवर दोन्ही बाजूनी दबाव टाकणे गरजेचे आहे. त्यासाठी अश्विनला इतर फिरकीपटूंची साथ मिळाली पाहिजे. भारताकडे अक्षर पटेलचा पर्याय आहे. परंतु, त्यांना रविंद्र जाडेजाची उणीव भासेल, असे पनेसारने नमूद केले.


हेही वाचा – ODI Rankings : विराट कोहली नंबर वन