अखेर जडेजाने शतक झळकावले

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अष्टपैलू रविंद्र जडेजाने शतक झळकावले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक आहे.

रविंद्र जडेजा (सौ-Cricinfo)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सध्या पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याला पहिले शतक करण्यासाठी ५६ कसोटी डाव खेळावे लागले. या सामन्याच्या पहिल्या डावात जडेजासह पदार्पण करणारा पृथ्वी शॉ आणि कर्णधार विराट कोहली यांनीही शतक झळकावले. त्यामुळे पहिल्या डावात भारताने ६४९ धावांचा डोंगर उभारला.

५६ डावानंतर शतक

रविंद्र जडेजाला कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावण्यासाठी ५६ डाव लागले. त्यामुळे पहिले शतक झळकावण्यासाठी सर्वाधिक वेळ लागलेल्या भारतीय खेळाडूंच्या यादीत त्याचा तिसरा क्रमांक लागतो. कसोटी क्रिकेटमध्ये पहिले शतक करण्यासाठी जडेजाहून अधिक वेळ घेणारे भारतीय खेळाडू म्हणजे अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग. कुंबळेला पहिले शतक करण्यासाठी १५१ डाव लागले होते. त्याने २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध आपले पहिले शतक झळकावले होते. तर हरभजन सिंगला पहिले शतक करण्यासाठी १२२ डाव खेळावे लागले होते.

अवघ्या १३२ चेंडूंत शतक

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात जडेजाने आक्रमक शतक झळकावले. त्याने हे शतक अवघ्या १३२ चेंडूंत पूर्ण केले. त्याच्या १०० धावांत ५ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. तसेच त्याने कर्णधार कोहलीसह सहाव्या विकेटसाठी ६४ धावांची तर नवव्या विकेटसाठी उमेश यादवसह ५५ धावांची भागीदारी केली.