घरक्रीडाIND vs AUS : रविंद्र जाडेजाला संधी? भारतीय संघात मोठे बदल होण्याची...

IND vs AUS : रविंद्र जाडेजाला संधी? भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता 

Subscribe

जाडेजाचे भारतीय संघात पुनरागमन होण्याची शक्यता असून हनुमा विहारी संघातून बाहेर होऊ शकेल.

पहिल्या डावातील आघाडीनंतरही भारतीय संघाने अ‍ॅडलेड येथे झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची डे-नाईट कसोटी गमावली. भारताने पहिल्या डावात २४४ धावांची मजल मारली होती. मात्र, भारताचा दुसरा डाव केवळ ३६ धावांतच संपुष्टात आला. ही भारताची कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या ठरली. त्यामुळे आता २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. अष्टपैलू रविंद्र जाडेजा पायाच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू शकला नव्हता. दुसऱ्या कसोटीआधी तो फिट झाल्यास त्याचे भारतीय संघात पुनरागमन होण्याची शक्यता असून हनुमा विहारी संघातून बाहेर होऊ शकेल.

विहारीला पहिल्या कसोटीत फारशा धावा करता आल्या नाहीत. त्याने पहिल्या डावात १६ आणि दुसऱ्या डावात ८ धावा केल्या होत्या. मात्र, कमी धावांमुळे नाही, तर संघ अधिक संतुलित करण्याच्या दृष्टीने कर्णधार अजिंक्य रहाणे आणि प्रशिक्षक रवी शास्त्री विहारीला डच्चू देण्याचा विचार करू शकतील, अशी माहिती आहे. ‘जाडेजा पूर्णपणे फिट असेल आणि बरीच षटके टाकण्यास तयार असेल, तर त्याला संघात स्थान मिळेल याबाबत शंका नाही. जाडेजा अष्टपैलू आहे. त्यामुळे त्याला विहारीच्या जागी संधी मिळू शकेल. जाडेजा खेळल्यास भारताला गोलंदाजांचे पाच पर्याय उपलब्ध होतील,’ असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. जाडेजाने आतापर्यंत ४९ कसोटीत १८६९ धावा केल्या असून त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात याआधी अर्धशतके केली आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -