कोहलीच्या टीमची पुन्हा हाराकिरी! दिल्लीनं पाजलं पाणी!

DC vs RCB in IPL

करो या मरो या स्थितीमध्ये रविवारी घरच्या मैदानावर उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून कॅप्टन कोहलीसोबतच त्यांच्या हजारो चाहत्यांनाही मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, बंगळुरूच्या टीमनं पुन्हा एकदा हाराकिरी करत आयपीएलच्या यंदाच्या हंगामातला सलग सहावा पराभव स्वीकारला. त्यामुळे बंगळुरूच्या चाहत्यांची भयंकर निराशा झाली आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच टॉस दिल्लीचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं जिंकल्यामुळे बंगळुरूच्या चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. सुरुवातीपासूनच बॅटिंगचा भार आपल्या खांद्यावर घेत कॅप्टन विराट कोहली स्वत: पार्थिव पटेलसोबत ओपनिंगला आला. पार्थिवनं पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात देखील तशीच आश्वासक केली. पण दुसऱ्याच ओव्हरमध्ये मॉरिसच्या बॉलिंगवर लमिछानेनं पार्थिवचा कॅच टिपला आणि दिल्लीच्या बॉलर्सची बोहनी झाली. त्यानंतर आलेल्या एबी डिव्हिलियर्सनं कोहलीसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न सुरू केला.

दोघांची पार्टनरशीप रंगात येत असतानाच रबाडानं धोकादायक एबीला माघारी धाडलं. खराब फटका खेळताना एबीनं इनग्रामच्या हातात झेल दिला. त्यानंतर आलेला स्टॉयनिसदेखील फार काही करू शकला नाही. ११व्या ओव्हरमध्ये स्टॉयनिस आऊट झाल्यानंतर आलेल्या मोईन अलीनं जोरदार फटकेबाजी करत दिल्लीच्या बॉलर्सवर हल्ला चढवला. अवघ्या १८ बॉलमध्ये त्यानं ३२ धावा फटकावल्या. त्यात ३ षटकार आणि १ चौकाराचा समावेश होता. पण लमिछानेच्या बॉलिंगवर पुढे येऊन आक्रमक शॉट खेळणं त्याला महागात पडलं आणि मागे उभ्या असलेल्या रिषभ पंतनं बेल्स उडवून त्याला माघारी धाडलं. सुरुवातीपासून जपून खेळणारा कॅप्टन कोहली अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करेल, ही उपस्थितांची अपेक्षा देखील फोल ठरली. १८व्या षटकात ३३ बॉलमध्ये ४१ रन करून कोहली आऊट झाला आणि बंगळुरूच्या मोठ्या धावसंख्येच्या स्वप्नांवर पाणी फिरलं. तळाच्या बॉलर्सकडून फार काही होऊ न शकल्यामुळे बंगळुरूचा डाव अवघ्या १४९ रनांवर आटोपला.

दिल्लीच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. भरवशाचा शिखर धवन पहिल्याच बॉलवर साऊदीच्या बॉलिंगवर आऊट झाला. पण बंगळुरूचा हा आनंद फार काळ टिकला नाही. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कॅप्टन रिषभ पंतने ओपनर पृथ्वी शॉसोबत बंगळुरूच्या बॉलर्सची धुलाई सुरू केली. पृथ्वी शॉने टीम साऊदीच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये ५ चौकार वसूल करत पुढे काय वाढून ठेवलंय याचा अंदाज बंगळुरूच्या बॉलर्सला दिला. थेट ९व्या ओव्हरमध्ये नेगीनं पृथ्वी शॉची विकेट काढेपर्यंत त्यानं टीमला ६९ रनांपर्यंत आणून ठेवलं होतं. त्यानंतर कॅप्टन श्रेयस अय्यरनं सगळी सूत्र आपल्या हातात घेतली. कोलीन इनग्रामसोबत अय्यरनं ३९ रनांची पार्टनरशीप केली. इनग्राम आऊट झाला, तेव्हा दिल्लीला ४१ बॉलमध्ये ४२ रनांची आवश्यकता होती.

नंतर आलेल्या रिषभ पंतनं श्रेयस अय्यरसोबत मिळून बंगळुरूला पराभवाच्या दारापर्यंत आणून सोडलं. मात्र, १८व्या षटकात सैनीच्या बॉलिंगवर चहलने सोपा कॅच पकडत अय्यरला तंबूचा रस्ता दाखवला. मात्र, तोपर्यंत मॅच आरसीबीच्या हातून निसटली होती. १६ बॉलमध्ये फक्त ५ रनांची आवश्यकता होती. त्याच ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलमध्ये सैनीनं मॉरिसला देखील आऊट केल्यामुळे टीम बंगळुरूला थोडीफार विजयाची आशा निर्माण झाली. पुढच्याच १९व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजनं रिषभ पंतला आऊट केल्यामुळे मॅचमध्ये थोडीफार रंगत निर्माण झाली. यावेळी दिल्लीला विजयासाठी ११ बॉलमध्ये ३ रनांची आवश्यकता होती. पण अखेर अक्षर पटेलनं चौकार मारत १९व्या ओव्हरमध्येच मॅचचा निकाल लावला आणि एक ओव्हर शिल्लक ठेऊन मॅच दिल्लीच्या खिशात गेली.