IPL 2021 : RCB vs KKR शेवटच्या षटकापर्यंत रंगला सामना; RCB चे आव्हान संपुष्टात

RCB-vs-KKR

सोमवारी झालेल्या केकेआर विरूध्दच्या एलिमिनेटरच्या सामन्यात विराट कोहलीच्या आरसीबीचा दारूण पराभव झाला असून त्यासोबतच आरसीबीचे हंगामातील आव्हान देखील संपुष्टात आले आहे. केकेआरने शेवटच्या षटकात २ चेंडू आणि ४ गडी राखून सामन्यावर विजय मिळवला. सोबतच एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीसाठी प्रवेश मिळवला. विराट कोहलीच्या कर्णधार पदाच्या नेतृत्वातील आरसीबीचा हा शेवटचा सामना होता.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ७ बळी १३८ धावांची उभारणी केली. आरसीबीची धावपट्टी सुरूवातीला वेगाने पुढे जात होती. कोहली आणि पडिकल या दोघांच्या भागीदारीच्या बदल्यात संघाची पहिल्या ५ षटकांत ४९ धावांची नोंद होती. नंतर लॉकी फर्ग्युसनने पडिकलचा २१ धावांवर बळी घेत आरसीबीला पहिला धक्का दिला, दरम्यान आरसीबीची धावसंख्या मंदावत गेली. कर्णधार विराट कोहलीने ३९ धावांची सर्वाधिक धावसंख्या केली, केकेआरच्या आक्रमक गोलंदाजी समोर बेंगळुरूचे फलंदाज पूर्णत: अपयशी ठरत होते, केकेआरचा फिरकीपट्टू सुनिल नारायणने ४ षटकांत २१ धावा देत ४ बळी घेतले, अखेर २० षटकांत १३८ धावांपर्यंतच आरसीबीला मजल मारता आली.

दुसऱ्या इनिंग मध्ये केकेआरला विजयासाठी १२० चेंडूत १३९ धावांची गरज होती. केकेआर चा संघ सुरूवातीपासूनच सावधगिरीने फलंदाजी करत होता. सलामीवीर शुभमन गिलने (२९) आणि व्यंकटेश अय्यरने (२६) अशा धावा करत ५.२ षटकांत ४१ धावा बनवून संघाला चांगली सुरूवात करून दिली. नंतर दोन्ही सलामीवीर फलंदाजांना बाद करण्यात हर्षल पटेलला यश आले. नितीश राणा आणि सुनिल नारायणच्या अनुक्रमे २३ धावांनी केकेआरचा संघ विजयाकडे कूच करत होता. राणाला चहलने डेविलियर्सच्या हातात झेल देऊन बाद केला. सामना केकेआरच्या पारड्यात झुकत चालला होता तेवढ्यात मोहम्मद सिराजने १८ व्या षटकात २ बळी घेऊन आरसीबीच्या तात्पुरत्या आशा पल्लवीत केल्या. शेवटच्या षटकात केकेआरला विजयासाठी ७ धावांची गरज होती ज्याला मॉर्गन आणि शाकिब अल हसनने पूर्ण करत सामना आपल्या संघाच्या नावे केला.

KKR ने २० षटकांत RCB ला १३८ धावांवर रोखले

केकेआरने एलिमिनेटरच्या सामन्यात आरसीबीला ७ बाद १३८ धावांवर रोखले, फिरकीपट्टू सुनिल नारायणच्या घातक गोलंदाजीसमोर आरसीबीचे फलंदाज चितपट झाले. नारायणने आपला जुना फॉर्म दाखवत २१ धावा देत ४ बळी घेतले. विराट कोहली, एबी डिविलियर्स आणि ग्लेन मैक्सवेल हे नारायणच्या फिरकी समोर ठरले अपयशी.

सामन्यात KKR च्या फिरकीपट्टूंचे वर्चस्व 

केकेआरचा फिरकीपट्टू सुनिल नारायणने ४ षटकांत २१ धावा देत ४ बळी घेऊन प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. वरूण चक्रवर्तीने ४ षटकांत २० धावा देत प्रतिस्पर्धी संघावर दबाव कायम ठेवला. तर शाकिब अल हसनने ४ षटकांत २४ धावा दिल्या, केकेआरच्या फिरकीपट्टूंनी १२ षटकांत फक्त ६५ धावा दिल्या त्यात फक्त ४ चौकारांचा समावेश आहे. सुरूवातीला आरसीबीचा चालू असलेला धावसंख्याचा वेग कमी करण्यासाठी फिरकीपट्टूंनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. आरसीबीच्या मागच्या सामन्यातील हिरो भरत हा देखील चांगली कामगिरी करू शकला नाही, त्याने १६ चेंडूत ९ धावा बनवल्या त्याला बाद करण्यात सुनिल नारायणला यश आले.